Nashik new water pipeline File Photo
नाशिक

Nashik News | नाशिककरांना 1 एप्रिलपासून नव्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : केंद्राच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तब्बल 171 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेल्या महत्त्वांकाक्षी गंगापूर धरण थेट जलवाहिनीचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून, 31 मार्चअखेरपर्यंत जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचा अल्टिमेटम संबंधित मक्तेदार कंपनीला देण्यात आला आहे. येत्या 1 एप्रिलपासून नाशिककरांना या नव्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणावरील पंपिंग स्टेशनद्वारे पाणी उचलून थेट जलवाहिनीद्वारे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते. तेथे या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया होऊन शहरातील विविध जलकुंभांद्वारे घरोघरी पाणी वितरण होते. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सन 1997 ते 2000 या दरम्यान 1200 मिमी व्यासाच्या दोन सीमेंटच्या थेट जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. 2021 पर्यंतच्या अंदाजित 21 लाख लोकसंख्येला पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने या थेट जलवाहिनीची रचना करण्यात आली होती.

गेल्या 26 वर्षांत या जलवाहिनीची वहनक्षमता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. 2026 च्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करण्यासाठी सदर थेट जलवाहिनी सक्षम नाही. जलवाहिनी जुनी झाल्यामुळे वारंवार गळतीची समस्याही उद्भवत आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान 425 एमएलडी क्षमतेची 12.50 किलोमीटर लांबीची 1800 मिमी व्यासाची लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. यासाठी केंद्राच्या 15 व्या वित्त आयोगातून 171 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.

100 कोटींचे पाइप

या योजनेसाठी गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान 12.50 किलोमीटर लांबीची थेट जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या जलवाहिनीसाठी 1800 मिमी व्यासाचे सुमारे 12 मीटर लांबीचे तब्बल 1040 पाइप जेडब्ल्यूआयएल कंपनीच्या हाजरा, सुरत येथील प्रकल्पातून नाशिकमध्ये आणण्यात आले होते. या पाइपचीच किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे.

9 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण

या योजनेंंतर्गत 12.50 किलोमीटरपैकी 9 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र परिसर, भोसला मिलिटरी कॉलेजमागील संत कबीरनगर झोपडपट्टी परिसर, महात्मानगरमधील काही भाग तसेच गंगापूर धरण परिसरातील एकूण 3.5 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम अद्याप शिल्लक आहे. मार्चअखेरपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली थेट पाइपलाइन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्चअखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून, 1 एप्रिलपासून नवीन जलवाहिनीद्वारे नाशिककरांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.
- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT