देवळाली कॅम्प (नाशिक) : भगूर - देवळाली मार्गावरील जागृत देवस्थान असलेल्या रेणुकामाता मंदिरासह देवळाली कॅम्प परिसरात पाच मंदिरे व २१ सार्वजनिक मंडळे नवरात्रोत्सव साजरा करत आहेत. त्यात दुर्गादेवी, मरीमाता, शीतलामाता, महालक्ष्मीमाता, भगुरचे देशमुख वाडा मंदिर, आठवडे बाजारातील सप्तशृंगीदेवी मंदिरासह लॅम रोड, शिंगवे बहुला, संसरी, नानेगाव, राहुरी, दोनवाडे, वंजारवाडी, लोहशिंगवे या गावांत विविध मंडळांमध्ये विधिवत श्रद्धापूर्वक घटस्थापना करण्यात आली.
भगूर - देवळाली दरम्यान रेस्ट कॅम्प रोडवरील व भगूरची अष्टभुजा रेणुकादेवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीच्या मंदिरात घटस्थापना, महाअभिषेक, देवीचा साजशृंगार व मंदिराचे पुजारी वंदन चिंगरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. घटस्थापना वंदना चिंगरे यांनी केली. परंपरेनुसार महिला घटी बसल्या आहेत. मंदिर प्रशासनाच्या वतीने घटी बसलेल्या महिलांना निवास, स्नान, तत्सम सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. देखरेखीसाठी २१ सीसीटीव्ही कॅमेरे मंदिरासह प्रांगणात लावण्यात आले आहेत.
भाविकांना दर्शन घेण्यासाठी महिला, पुरुष स्वतंत्र दर्शन रांगांची सुविधा करण्यात आली आहे. पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. देवळालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त रेस्ट कॅम्प रोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.