Nashik Police Recruitment
पोलिस भरती नाशिक File Photo
नाशिक

Nashik | नाशिक ग्रामीण पोलिस भरती मैदानी चाचणीचा निकाल जाहीर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिस दलातील ३२ जागांसाठी झालेल्या मैदानी चाचणीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात खुल्या प्रवर्गाचे मेरिट ४३ इतके असून, इतर प्रवर्गनिहाय गुण जाहीर करण्यात आले आहेत. तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयाने पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी ३१६ उमेदवारांची तात्पुरती निवड केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची जुलै महिन्यात लेखी परीक्षा होणार असून, त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

ग्रामीण पोलिस दलात ३२ जागांसाठी दोन हजार ६०२ पुरुष, ५७६ महिला, ४२ माजी सैनिक व इतर पाच उमेदवारांचे अर्ज प्राप्त होते. त्यानुसार ग्रामीण पाेलिसांनी आडगाव येथील मुख्यालयाच्या मैदानावर १९ ते २२ जून या कालावधीत मैदानी चाचणी प्रक्रिया घेतली. या चाचणीसाठी तीन हजार १६० उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी एक हजार ८१८ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातील २५३ उमेदवार छाती, उंची व इतर निकषांमध्ये अपात्र ठरले. तर एका उमेदवाराने स्वच्छेने भरती प्रक्रियेतून माघार घेतली. मैदानी चाचणी दिलेल्या एक हजार ५६५ उमेदवारांपैकी ६८० जणांना पंचवीसपेक्षा जास्त गुण मिळाले. त्यापैकी रिक्त जागांनुसार 'एकास दहा उमेदवार' या निकषानुसार ३१६ जणांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता उमेदवारांचे लक्ष लेखी परीक्षेकडे लागले आहे.

७ जुलैला लेखी परीक्षा

येत्या ७ जुलै रोजी सकाळी सात वाजता आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी महाविद्यालयात पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलवर हॉल तिकिट पाठविण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. लेखी परीक्षेनंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होत ग्रामीण पोलिस दलात शिपाई पदावर उमेदवारांची निवड होईल. तसेच लेखीसाठी पात्र उमेदवारांना अडचण असल्यास त्यांनी ०२५३-२२००४०१, २२००४९५ किंवा २२००४९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

----

प्रवर्गनिहाय गुणवत्तायादी

प्रवर्ग - मेरीट (कंसात महिला)

खुला - ४३ (३३)

अनुसूचित जाती (एससी) - ३० (२८)

अनुसूचित जमाती (एसटी) - ३६ (२६)

विमुक्त जाती अ (व्हीजे ए) - ३४

भटक्या जमाती ब (एनटी बी) - ३७

भटक्या जमाती क (एनटी सी) - ३५

भटक्या जमाती ड (एनटी डी) - ४१

विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) - २६

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या विशेष मागास प्रवर्ग (एसईबीसी) - २५ (२६)

इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) - ३२ (२६)

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) - २६ (२५)

SCROLL FOR NEXT