धुलीवंदनच्या दिवशी संध्याकाळी गोदाघाटावर 'वीर नाचविणे' उत्साहात साजरे करण्यात आले. (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik | वीरांच्या मिरवणुकीने दुमदुमले नाशिक

होलिकोत्सवादरम्यान दरवर्षी नाशिकच्या गोदाघाटावर 'वीर' नाचविण्याची परंपरा साजरी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : छत्रपतींच्या शौयाचे स्मरण करुन देणारे वीर शिवाजी, माँसाहेब जिजाऊंनी ज्यांच्या मनावर स्वराज्याचे संस्कार ठसविले ते 'बाल शिवाजी, सनातन धर्माचे अर्ध्वयू भगवान शिवशंकर, दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळविणारे भगवान राम यांचा साक्षात्कार घडवून आणणारी नाशिकची थोर परंपरा 'वीर नाचविणे' धुलीवंदनच्या दिवशी शुक्रवारी (दि.14) संध्याकाळी गोदाघाटावर उत्साहात साजरी करण्यात आली.

होळी नंतर साजरी करण्यात येणारी धुलीवंदन निमित्त परंपरा जपतांना कुटुंबासमवेत चिमुकली.

होलिकोत्सवादरम्यान दरवर्षी नाशिकच्या गोदाघाटावर 'वीर' नाचविण्याची परंपरा साजरी केली जाते. ज्या कुटूंबांतील 'वीर' लढवय्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला साकार रुप देण्यासाठी लढतांना धारातिर्थी पडले, त्यांचे पवित्र स्मरण म्हणून ही परंपरा धुलीवंदनाच्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. त्या वीरांचे स्मरण करतांना त्यांच्या नावे छत्रपतींचे, भगवान रामाचे, भगवान शंकरांचे, मावळ्यांचे रुप घेऊन देवघरातील देव पवित्र लाल कापडांत बांधुन गोदाघाटावर सवाद्य मिरवणुकीत नाचविले जातात. ही परंपरा साजरी करतांना डीजेच्या तालावर शेकडो भाविकांनी गोदाकाठी ताल धरला. यावेळी विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता.

धुळवड ची परंपरा साजरी करतांना लहानगे

अनेकांनी यावेळी वीर शिवाजी, भगवान राम, भगवान शंकर यांचे पोशाख परिधान केलेल्या वीरांसोबत सेल्फी काढले. आकर्षक विद्युत रोषणाई, ढोलताशांचा गजर, भाविकांची गर्दी अन हातात तलवार घेऊन नाचणारे वीर, सोबत गाडगे महाराज पुल ते रामसेतू पुलापर्यंत खेळण्यांची, दागिन्यांची दुकाने, भेलपुरी अन आईस्क्रीमचे ठेले, खेळाचे साहित्य यामुळे परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. नाशिककरांनी यावेळी पुढच्या पिढीला 'वीर' परंपरा माहित व्हावी यासाठी सहकुटूंब गोदाघाटाला भेट देत मुलांना वीर दाखविले. रात्री उशीरापर्यंत 'वीर' नाचविण्याची परंपरा साजरी करण्यात आली. पोलीसांनीही यावेळी कडक बंदोबस्त ठेवत नागरिकांना सुरक्षा प्रदान केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT