River Pollution  Pudhari
नाशिक

Nashik Nandini River Pollution | नंदिनी नदीपात्रात महापालिकेने सोडले मलजल

Nashik Nandini River Pollution | याचिकाकर्ते राजेश पंडित यांचा आरोप : फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एकीकडे नंदिनी नदी महास्वच्छता अभियान राबविले जात असताना, दुसरीकडे मुंबई नाका परिसरात पावसाळी गटारांना थेट मलजल वाहिन्या जोडून महापालिकेने नंदिनी नदीपात्रात थेट मलजल सोडल्याचा गंभीर आरोप याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी केला आहे.

यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान झाल्याचा दावा करीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांमार्फत स्थळ पाहणी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी पंडित यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे केली आहे. पंडित यांनी यासंदर्भात डॉ. गेडाम यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई नाका परिसरात महापालिकेने टाकलेल्या पावसाळी गटारांमध्ये त्या भागातील मलजल वाहिनीचे जाळे थेट जोडण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या १० ते १२ वर्षांपासून या लाइनमधून वर्षभर, दिवसाचे २४ तास कोणतीही प्रक्रिया न करता, मलजल थेट नंदिनी नदीत सोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नंदिनी नदी महास्वच्छता अभियानानंतर नदीपात्रातील गाळ काढताना ही बाब निदर्शनास आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. गूगलवरील उपलब्ध छायाचित्रे आणि माहितीच्या आधारे संबंधित काम सुमारे दशकभरापूर्वी करण्यात आल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे नदीचे प्रदूषण वाढत असून, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने स्थळ पाहणी करून अहवाल सादर करावा, या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करून संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच प्रदूषण नियंत्रण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ४३१ अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी पंडित यांनी केली आहे. हा संपूर्ण प्रकार उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT