नांदगाव (नाशिक) : ऊसतोडणीसाठी श्रीगोंदा तालुक्यात गेलेल्या नांदगाव तालुक्यातील कुंटुबाला मिरच्या तोडल्याच्या कारणावरून जबर मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर साेशल मिडियातून समोर आल्याने या घटनेबद्दल नांदगाव तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत आमदार सुहास कांदे यांनी दखल घेत पोलिस अधिक्षक यांना लक्ष घालण्याची विंनती केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी (ता. श्रीगोंदा) शिवारात ऊस तोडणीसाठी नांदगाव तालुक्याल कुंटुब गेलेले आहे. यातील दोघा महिलांना मिरच्या तोडल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या प्रकरणी महिलांसह लहान मुलांनाही मारहाण झाल्याची तसेच अतिप्रसंग करण्यात आल्याचा आरोप पीडितांपैकी दोघा महिलांनी केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या हल्ल्यात काही महिलांसह अठराहून अधिक जण जखमी झाले आहेत.
गोरगरीब मजुरांना मारहाण होणे निंदनीय आहे. अहिल्यानगर येथील पोलिस प्रमुखांसोबत तत्काळ दूरध्वनीद्वारे संवाद साधून घटना गंभीर्याने घेण्याची विनंती केली. मुजरांनी मनात कोणते प्रकारचा धाक न बाळगता आपला कामधंदा सुरू ठेवावा. काही अडचण असल्यास तत्काळ माझ्यासोबत संपर्क करावा.आमदार सुहास कांदे, नांदगाव
विशेष म्हणजे सदर घटना सोशल मडियावर सर्वत्र व्हायरल होत असताना या घटनेची फिर्याद घेण्यासाठी संबधितांना जिल्हा पोलिस मुख्यालयात दिवसभर ठिय्या आंदोलन करावे लागाले. त्यानंतर पीडित माय-लेकींची तक्रार नोंदवून घेण्यात आली. सदर तक्रार श्रीगोंदा पोलिसाकडे वर्ग झाल्याची सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेबाबत पिडित महिलांनी रिपब्लिकन नेते दीपक केदारे यांना माहिती कळविल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती आमदार सुहास कांदे याना कळली. आमदार कांदे यांनी अहिल्यानगरचे पोलिस अधिक्षक यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करीत लक्ष घालण्याची विनंती केली.
अहिल्यानगर येथे जिल्हा पोलिस मुख्यालयात जाऊन पीडितांची भेट घेऊन धीर देण्याचा प्रयत्न केला. या महिलांना जबर मारहाण झालेली आहे. घटनेच्या तीन दिवसांनंतरही त्यांच्या शरिरावरील मारहाणीचे काळेनिळे व्रण स्पष्ट दिसत होते.महावीर जाधव, सामाजिक कार्यकर्ते, नांदगाव