Heavy rains have caused extensive damage to agricultural crops
नांदगाव (नाशिक) : सचिन बैरागी
नांदगाव तालुक्यात शनिवार ( दि. २७ ) सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे तर रविवार ( दि. २८ ) सकाळपर्यंत पावसाने अक्षरश: मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पुर परिस्थिती निर्माण झाली असून, तालुक्यातील छोटी मोठी सर्व बंधारे तुडुंब भरली गेली आहे.
नांदगाव शहरातून वाहणाऱ्या शाकंभरी नदी आणि लेंडी नदी या दोन नद्यांना देखील पूर आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचे पाण्यामुळे मक्का, कांदे, कापूस या पिकांसह खरीप हंगामातील सर्व पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शेतकऱ्यांसह या पावसाचा व्यापारी वर्गाला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कांदा व्यापारी गोकुळ खैरनार यांच्या शेडमध्ये पाणी शिरल्याने कांदा आणी मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दहेगाव धरण 99 टक्के भरले
सुरुवातीला विजांच्या कडकडासह वादळी वारे मोठ्या प्रमाणात आल्याने परिसरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे. नांदगाव शहरालगत असलेले दहेगाव धरण 99 टक्के भरले असून लवकरच 100 टक्के भरणार असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगितले जात आहे. शाकंभरी आणि लेंडी नदीला पाण्याची पातळीत वाढ होत असल्याने शहरातील नदीकाठच्या रहिवाशांची धावपळ होत आहे.