इंदिरानगर (नाशिक) : कॅफेमध्ये बसलेल्या २२ वर्षीय युवकावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. राशिद हारूण खान (२२, रा. अंबड लिंक रोड, खाडी) असे मृताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २५) दुपारी 3 ते 7 च्या दरम्यान राशिद हारूण खान यावर पूर्ववैमनस्यातून आलेल्या अनोळखी चार ते पाच संशयितांनी कॅफेच्या वरच्या मजल्यावर जाऊन धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यात त्याच्या मानेवर, तोंडावर गंभीर जखमा झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही बाब इंदिरानगर पोलिसांना कळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. कायदा व सुव्यवस्था उद्भवू नये, यासाठी पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मयत राशिद खान हा अंबड लिंक रोडवरील फॅब्रिकेशन दुकानात काम करीत होता. घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी खून करणाऱ्या टोळक्याचा शोध सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
गाडी चालविण्याच्या वादातून हल्ला, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सातपूर : किरकोळ कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने युवकावर तुटून पडत धारदार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना श्रमिकनगर परिसरात घडली.
मृताचे नाव जगदीश अशोक वानखडे (२३, रा. श्रमिकनगर) असे असून, तो सातपूर येथील खासगी कंपनीत कार्यरत होता. मंगळवारी (दि. 23) रात्री तो मित्रासमवेत कार्बन नाका येथे चहा पिण्यासाठी गेला होता. चहा घेतल्यानंतर घरी परतताना लक्ष्मी हाइट्स इमारतीजवळ त्याची दुचाकी थांबवून काही तरुणांनी वाद घातला. प्रणव जगतापने, गाडी नीट का चालवत नाही? असा प्रश्न विचारत जगदीशशी वाद घातला. त्यानंतर प्रणव जगताप व त्याच्या साथीदारांनी जगदीशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या जगदीशला प्रथम सातपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रणवच्या मित्राने दिलेल्या फिर्यादीवरून, आदित्य यादव, प्रणव जगताप, श्रावण वाघ, साहिल गांगुर्डे, शुभम मगर, आप्पा चोथे, समाधान यादव, सुमित यादव यांच्यासह 10 जणांविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही जण सराईत गुन्हेगार असून, परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही या टोळक्याविरुद्ध निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.