नाशिक : मुलबाळ होत नाही तसेच पहिल्या पत्नीकडेच जास्त वेळ राहतो या कारणातून आडगाव शिवारातील हिंदुस्थान नगर परिसरात शनिवारी (दि.१८) भावसार मुलचंद पवार उर्फ बाल्या (४५, रा. गुजरात) याचा खून झाला. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी तपास करीत भावसार यांच्या दुसऱ्या पत्नीस अटक केली आहे. तर इतर चौघांच्या शोधासाठी आडगाव पाेलिसांनी पथके नाशिकसह परजिल्ह्यात पाठवली आहेत.
सुनीता नागेश शिंदे (३२, रा. हिंदुस्थाननगर, आडगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने सुनीतास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. भावसार पवार या खेळणी विक्रेत्याचे दोन विवाह झाल्याचे समोर आले आहे. विवाहानंतर सुनीतास मुलबाळ होत नसल्याने व भावसार हा पहिल्या पत्नीकडेच जास्त राहत असल्याने सुनितास संताप होता. त्यावरून दोघांमध्ये वादही होत असे. दरम्यान, शनिवारी (दि.१८) सायंकाळी सुनितासह इतर चाैघांनी धारदार शस्राने वार करून सुनीलचा खून केला. भावसार याची पहिली पत्नी नीरमा पवार (३०) हिच्या फिर्यादीनुसार, आडगाव पाेलिसांत पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पंचवटी विभागाच्या सहायक आयुक्त पद्मजा बढे-चव्हाण, आडगावचे वरिष्ठ निरीक्षक सचिन खैरनार यांनी सहायक निरीक्षक निखिल बाेंडे, टी. आर. देवरे, उपनिरीक्षक मयूर निकम व पथकास सूचना करुन संशयितांची धरपकड करण्यास सांगितले. पथकाने गुन्हा घडल्यावर काही तासांतच सुनितास पकडले. तर सुनिताचे भाऊ राज नागेश शिंदे, आदित नागेश शिंदे (सर्व रा. हिंदुस्थाननगर, आडगाव) दीपक आणि एक अनोळखी संशयितांच्या शाेधासाठी दाेन पथके वाशीम, यवतमाळ, परभणी व गुजरातमधील सुरत येथे रवाना केली आहेत. तपास सहायक निरीक्षक तुषार देवरे करत आहेत.