नाशिक : कॉलेज रोड लगत असलेल्या संत कबीर नगर परिसरात टोळक्याने हल्ला करीत एका १७ वर्षीय मुलावर धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याची घटना शनिवारी (दि.८) रात्री घडली होती. याप्रकरणी गंगापूर व गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी सहा संशयितांची धरपकड केली असून त्यात दोन संशयित अल्पवयीन असून चौघांना अटक केली आहे. अरुण रामलू बंडी (रा. कामगार नगर) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
परिसरातील वर्चस्ववादातून टोळक्याने अरुणवर हल्ला केला होता. त्यात गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित पसार झाले. मात्र पोलिसांनी तपास करीत विलास संतोष थाटे (१८) व करण उमेश चौरे (१९), समीर मुनीर सैय्यद (२९) व जावेद सलीम सैय्यद (३२, चौघे रा. संत कबीर नगर) यांना अटक केली, तर इतर दोघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यापैकी करण आणि विलास यांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत (दि.१३) पोलिस कोठडी सुनावली आहे, तर संशयित समीर व जावेद सैय्यद यांना मंगळवारी (दि.११) न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच इतर दोघा अल्पवयीन संशयितांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, सहायक निरीक्षक निखील पवार, हर्षल अहिरराव, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, शरद पाटील, हवालदार गिरीष महाले, सोनु खाडे, सतीष जाधव आदींच्या पथकाने ही कामगिरी बजावली.