नाशिक

Nashik Murder | मुंबई महापालिकेतील लिपिकाचा नाशिकमध्ये खून; पत्नी, मेहुणीनेच रचला कट

गणेश सोनवणे

नांदगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव डोंगर परिसरात सोमवारी आढळलेल्या संशयास्पद मृतदेहाचा तपास करताना मोठ्या कटाचा उलगडा झाला. मुंबई महापालिकेतील लिपिकाचा कौटुंबिक वादातून पत्नी, मेहुणी, तिचा मुलगा, साडू यांनीच खून केल्याचे निष्पन्न झाले असून, नांदगाव पोलिसांनी २४ तासांत सहापैकी चार संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

गेल्या १७ तारखेला मुंबई मनपाचे कर्मचारी दीपक गोण्या सोनवणे (५४, रा. वाघोरे, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांचा मृतदेह सापडला होता. घटनास्थळी अपघाताचे चित्र दिसत असले तरी त्याबाबत संशय निर्माण झाल्याने त्यादिशेने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आधारकार्डवरून मयताची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांच्या हालचाली टिपण्यात आल्या. परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणानंतर आप्तांची विचारपूस करण्यात आली. त्यातून खुनाचा उलगडा झाला. सोनवणे व मोरे परिवारातील सहा जणांनी ही हत्या केल्याचे आणि पत्नीदेखील सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.

प्रेत झाडावर टाकून अपघाताचा बनाव

संशयित पत्नी पल्लवी दीपक सोनवणे, मेहुणी व मेहुणीचा मुलगा, नितीन चंद्रकांत मोरे (रा. म्हसवे, ता. पारोळा) यांनी संदीप (रमेश) महादू लोखंडे (रा. शेजवळ, ता. मालेगाव), साईनाथ बाबुलाल सोनवणे, लखन बाबुलाल सोनवणे (रा. पिंप्री हवेली, ता. नांदगाव) यांच्याशी संगनमत करून खुनाचा कट रचला. त्यानुसार दीपक यांना जातेगाव शिवारातील महादेव मंदिराजवळ बोलावून घेण्यात आले. या ठिकाणी लाकडी दांडक्याने व डोक्यात दगड मारून ठार केले. त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला ढकलून देत प्रेत झाडावर टाकून असा अपघाताचा बनाव करत सर्वांनी पाेबारा केला होता.

या चौघांना अटक

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर यांनी उपरोक्तसह अनिता चंद्रकांत मोरे (रा. म्हसदे, ता. पारोळा) अशा सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. पत्नी, लोखंडे, साईनाथ, नितीन मोरे यांना अटक झाली आहे.

.. म्हणून काढला काटा

मयत सोनवणे हे मुंबई महानगरपालिकेत लिपिकपदावर नोकरीला होते. ते घरगुती कारणावरून पत्नी व मेहुणीला त्रास देत होते. या जाचाला कंटाळून या दोघींनी हा कट रचल्याचे तपासात पुढे आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक प्रीतम चौधरी हे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT