देवळा ; देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरात कौटुंबिक वादातून मेव्हण्याने सालीचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि.२२ मे रोजी सकाळी घडली. या प्रकरणातील पसार आरोपीला खामखेडा येथील सरपंच अॅड. वैभव पवार व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मयत महिलेचे पती ज्ञानेश्वर सुरेश जाधव (वय ४१, रा. कॉलेज रोड, अहिल्यादेवी नगर, निफाड) यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी छाया ज्ञानेश्वर जाधव हिची बहीण माया हिचा विवाह श्याम आगनदास माळी (रा. धोडांबे, ता. चांदवड) याच्यासोबत झाला होता. श्याम माळी हा देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरात मजुरी करत वास्तव्यास होता. दारूच्या व्यसनासाठी तो पत्नी माया हिच्याकडून मजुरीचे पैसे घेत असल्याने त्यांच्या कुटुंबात वारंवार वाद होत होते.
माया हिला होणाऱ्या मारहाणीमुळे ती दि. २१ मे रोजी माहेरी निफाड येथे आली होती. त्यावेळी छाया जाधव ह्याही माहेरी आल्या होत्या. छाया यांनी पती ज्ञानेश्वर जाधव यांना फोन करून माया हिला श्याम माळी हा दारू पिऊन मारहाण करत असल्याचे तसेच “देवळ्याला या, डायरेक्ट चिरून टाकतो,” अशी धमकी दिल्याचे सांगितले होते.
यानंतर ज्ञानेश्वर जाधव, पत्नी छाया, सासू ताईबाई, साला सोनू कराटे व अन्य नातेवाईक शुक्रवारी सकाळी भऊर फाटा येथे श्याम माळी याची समजूत काढण्यासाठी गेले होते. ते निखील आहेर यांच्या शेताकडे जाणाऱ्या गेटजवळ थांबले असता आरोपी श्याम माळी हा त्याचा पुतण्या दादू माळी याच्यासोबत मोटारसायकलवर घटनास्थळी आला.
सुरुवातीला समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असताना आरोपीने अचानक चाकू काढून माया हिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनू कराटे यांनी मायाला मागे ओढल्याने वार चुकला. त्यानंतर आरोपीने “तू कायम आमच्या नवरा-बायकोमध्ये येते,” असे म्हणत छाया जाधव यांच्या छातीवर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या छाया जाधव यांना तातडीने कळवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भांडण सोडविताना सोनू कराटे यांच्या दोन्ही हातांनाही चाकूचे वार लागून दुखापत झाली.
घटनेनंतर आरोपी श्याम माळी हा घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याचा पोलीस शोध घेत असताना आरोपी पिळकोस-खामखेडा-सावकी परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते व पोलीस शिपाई संदीप चौधरी यांनी खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच अॅड. वैभव पवार यांना दिली.
त्यानुसार वैभव पवार यांनी तात्काळ खामखेडा चौफुली परिसरात शोधमोहीम सुरू केली. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या फोटोच्या आधारे संशयित आरोपी त्या परिसरातून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वैभव पवार यांनी माणिक शेवाळे, सचिन शेवाळे, रोशन शेवाळे, अमोल बिरारी, वकील शेवाळे व सौरभ शेवाळे यांना माहिती दिली. सर्वांनी मिळून आरोपीचा पाठलाग करत त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या धाडसी कामगिरीबद्दल ग्रामस्थांचे कौतुक होत असून आरोपीविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत, विनय देवरे, पोलीस हवालदार नितीन बाराहाते, भास्कर सोनवणे, दिलीप सोनवणे, संदीप चौधरी, शरीफ शेख, राहुल शिरसाठ , संजय मोरे पुढील तपास करीत आहेत.