नाशिक : मुंबई - आग्रा राेडवरील बीडी कामगार नगर परिसरात महिलांसह तरुणांनी एकाच्या डाेळ्यात मिरची पूड टाकून धारदार शस्त्राने हल्ला करत खून केला. रविवारी(दि.२४) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. यात विशांत भोये (२९ रा. बीडी कामगार नगर, अमृतधाम) हा युवकाचा खून झाला आहे.
विशांत हा स्वामी समर्थ केंद्राजवळ मित्रांसोबत गप्पा मारत होता. यावेळी अचानक काही महिला व तरुण तेथे आले. त्यांनी विशांत व त्याच्या मित्रांच्या डोळ्यात मिरची पूड फेकत हल्ला केला. टोळक्यातील एका संशयिताने विशांतवर कोयत्याने वार केला. यानंतर संशयित पळून गेले. वर्मी वार बसल्याने विशांत गंभीर जखमी झाला. त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. परिसरात दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता, त्यातून खून झाल्याची चर्चा आहे. आडगाव पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.