देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे १५ नगरसेवक निवडून आले असून, पैकी १० नगरसेवक हे नाशिकरोड प्रभागातील आहेत. शाखाप्रमुख ते उपजिल्हाप्रमुख व सलग तीन वेळा नगरसेवकपद जिंकणाऱ्या निष्ठावंत केशव पोरजेंना महापालिकेत पक्षाचे गटनेते पद देऊन निष्ठावंतांना न्याय दिला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
शिवसेना पक्षफुटीनंतर अनेक नगरसेवक व पदाधिकारी इतर पक्षांत जात असताना पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या केशव पोरजे यांच्यावर पक्षाने उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी टाकली. तत्पूर्वी वडनेर दुमाला सारख्या ग्रामीण भागातून शिवसेनेचे काम सुरू करणाऱ्या पोरजे यांनी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, गटप्रमुख, देवळाली विधानसभा प्रमुख ते उपजिल्हाप्रमुख अशी पदे भूषविली. नगरसेवक म्हणून निवडून आले.
सामाजिक कार्याचा धडाका, पक्षाशी एकनिष्ठपणा व अभ्यासू वृत्तीमुळे महानगरपालिकेत त्यांनी स्थायी समिती सदस्य तसेच नाशिकरोड प्रभाग समिती सभापती अशी पदेही भूषवली. चालू निवडणुकीत प्रभाग २२ मध्ये संपूर्ण पॅनल निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. याला कारण या प्रभागात आमदार सरोज आहिरे यांनी राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचाराचा झंझावात निर्माण केला होता.
परंतु, निष्ठेपुढे त्यांना माघार घ्यावी लागली. देवळाली गाव व संपूर्ण परिसरातील जुन्या-जाणत्या शिवसैनिकांनी निष्ठावंत पोरजे यांच्यावर विश्वास व्यक्त करताना त्यांचा संपूर्ण पॅनल निवडून दिले. १५ पैकी १० नगरसेवक शिवसेनचे (उबाठा) हे नाशिकरोड प्रभागातील आहेत. यावरूनच या पक्षाची ताकद या ठिकाणी किती आहे, हे लक्षात येते.
महापालिकेत निष्ठावंतांना न्याय देताना पक्षाकडून केशव पोरजे यांना गटनेतेपदाची जबाबदारी देत निष्ठावंतांचा सन्मान केला जाणार असल्याचा विश्वास या भागातील शिवसेनेतील जुने जाणते निष्ठावंत कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.