Nashik Kumbh Mela 2027  Pudhari News Network
नाशिक

Simhasta Kumbh Mela 2027 | सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपाच्या 227 कोटींच्या मलनिस्सारण प्रकल्पांना मंजुरी

Simhasta Kumbh Mela 2027 | 120 कोटींच्या नवीन तर 107 कोटींच्या जुन्या मलवाहिका बदलणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या अमृत २ अभियानांतर्गत नाशिक महापालिकेच्या २२७.१८ कोटी रुपयांच्या दोन मलनिस्सारण प्रकल्पांना राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामध्ये १२०.१७ कोटींच्या नवीन मलवाहिका तर १०७ कोटींच्या जुन्या मलवाहिका बदलण्याच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

या प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने सिंहस्थापूर्वी गोदावरी नदीप्रदूषणमुक्तीच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. नाशिकमध्ये येत्या २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थात अमृतस्नानासाठी सुमारे पाच लाख साधू-महंत व सात कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे.

सद्यस्थितीत ठिकठिकाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेल्या सांडपाण्याच्या नाल्यांमुळे गोदावरी नदी प्रदूषित बनली आहे. त्यातच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने उभारलेली मलनिस्सारण केंद्रे जुन्या निकषांवर आधारित असल्याने गोदाप्रदूषणात भर पडत आहे.

मलनिस्सारण केंद्राच्या क्षमतावाढ व आधुनिकीकरणासाठी महापालिकेच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर प्रकल्प राबविला जात आहे. मात्र या मलनिस्सारण केंद्रापर्यंत सांडपाणी वाहून आणण्यासाठी पर्याप्त क्षमतेच्या मलवाहिका नसल्यामुळे नदीप्रदूषणमुक्तीला अडचण निर्माण झाली होती.

त्यातच नव्याने विकसित होणाऱ्या भागात मलवाहिकांचे जाळे नसल्यामुळे तेथील नागरिकांची देखील कोंडी होत होती. त्यावर मार्ग काढण्यासाठी महापालिकेने नवीन मलवाहिकांचे जाळे निर्माण करण्यासाठी १२०.१७ कोटी तर जुन्या मलवाहिका बदलून अधिक क्षमतेच्या मलवाहिका टाकण्यासाठी १०७.०१ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प अहवाल शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक मान्यतेनंतर राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने व राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने या दोन्ही प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखविला होता. यानंतर राज्य शासनाच्या नगरविकास विभागानेदेखील अंतिमतः या दोन्ही प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

या ठिकाणी होणार नवीन मलवाहिका

१२०.१७ कोटींच्या प्रकल्पांतर्गत नवीन मलवाहिका टाकल्या जाणार आहेत. यात नंदिनी नदी ते विठ्ठल नर्सरी ते कामटवाडा ते उंटवाडी सिव्हेज पंपिंग स्टेशन या दरम्यान ५.१२ किमी. लांबीची ८.३५ कोटींची नवीन मलवाहिका टाकली जाणार आहे. याशिवाय किचन सम्राट ते वारकरी चौक दरम्यान ३.०२ कोटी, सराफ लॉन्स ते गुरू गोविंद सिंग कॉलेज ४.४१ कोटी, रोकडोबा हनुमानमंदिर ते नवीन गणेशवाडी ११.४४ कोटी, सारडा सर्कल ते रोकडोबा हनुमान मंदिर ३.९१ कोटी, होळकर पूल ते रोकडोबा हनुमान मंदिर १०.७७ कोटी, हुसेन चौक ते भद्रकाली पंपिंग ते बालाजी मंदिर, १०.०७ कोटी आदी कामे केली जाणार आहेत.

या जुन्या मलवाहिका बदलणार

१०७.०१ कोटींच्या प्रकल्पांतर्गत ठिकठिकाणी जुन्या मलवाहिका बदलून अधिक क्षमतेच्या नवीन मलवाहिका टाकल्या जाणार आहेत. यात गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर तपोवन एसटीपी ते मानूर सिव्हेज पंपिंग स्टेशन ३.६९ कोटी, वरुणा नदीच्या उजव्या बाजूला धबधबा ते नवीन भाजीबाजार १.५४ कोटी, कपिला संगम ते पुरिया पार्क ११.९५ कोटी, भाभानगर ते नंदिनी नदी या दरम्यान ७.२८ कोटी, चांदशी पूल ते कुसुमाग्रज स्मारक ६.०३ कोटी, छत्रपती संभाजी महामार्ग ते रुद्रा फार्म या दरम्यान मलवाहिका टाकण्यासाठी २.०७ कोटी आदी कामे केली जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT