नाशिक: जिल्ह्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत माघारीनंतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली असून पक्षाच्या नेत्यांकडून प्रचाराचे नारळही फोडण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवारांना अद्यापही निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळालेले नसल्याने त्यांना चिन्हाशिवायच प्रचार करावा लागत आहे.
माघारी संपल्यानंतर मतदानासाठी आठ दिवसांचा कालावधी असताना चार दिवस चिन्ह वाटपात उशीर झाल्याने तब्बल चार दिवस अपक्षांना चिन्हाविना प्रचार करावा लागण्याची वेळ आली आहे. दोन डिसेंबरला मतदान असल्याने ३० नोव्हेंबरपासून प्रचार संपुष्टात येणार आहे. आयोगाकडून २६ नोव्हेंबर रोजी अपक्षांना चिन्ह वाटप करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर केवळ चारच दिवस प्रचारासाठी उरणार असल्याने अपक्ष उमेदवार किती प्रमाणात चिन्हासह प्रचार करू शकतील, असा प्रश्न आहे.
येत्या दोन डिसेंबर रोजी येवला, मनमाड, इगतपुरी, नांदगाव, ओझर, त्र्यंबकेश्वर, सटाणा, सिन्नर, पिंपळगाव बसवंत, चांदवड आणि भगूर या ११ नगरपालिकांमध्ये मतदान होत आहे. माघारी प्रक्रिया संपल्यानंतर पक्षीय उमेदवारांनी ताबडतोब प्रचाराला सुरुवात केली. मात्र अपक्षांना चिन्ह न मिळाल्याने त्यांना मतदारांना आपली निशाणी काय सांगावी, याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
चिन्हाअभावीही जोमात प्रचार सुरू
चिन्ह मिळण्यास विलंब असतानाही अपक्ष उमेदवारांनी प्रचार थांबवलेला नाही. पत्रके छापणे, रील्स तयार करणे, व्हिडिओ बनवणे, सोशल मीडियावर प्रचार करणे, घराघरात जाऊन भेटीगाठी घेणे असा प्रचाराचा धडाका सुरू आहे. चिन्ह नसल्याने काही उमेदवारांनी पत्रकांवर आपला परिचय छापण्यावर भर दिला आहे, तर काही उमेदवार म्हणतात, “चिन्ह नसेल तर काय झाले? लवकरच मिळेलच!” असे म्हणत ते प्रचारात गुंतलेले आहेत.