नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राजकारण हे केवळ सत्ता मिळविण्याचे माध्यम न राहता, आता अनेक कुटुंबांसाठी वारसा बनत आहे. याची झलक महापालिका निवडणुकीत दिसून येत असून, अनेक बाप बेटे निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत आहेत, तर काहींनी मुलाच्या विजयासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यानिमित्त नव्या-जुन्यांचा संगम दिसत असून, मतदार त्यांना साद घालणार काय? याकडे लक्ष लागून आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दशकांपासून सक्रिय असलेल्या प्रस्थापित नेत्यांनी आपला वारसा पुढच्या पिढीकडे सोपविण्यासाठी त्यांना मैदानात उतरविले आहे. काही नेते स्वतः मुलाबरोबर निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत. नवी पिढी उच्चशिक्षित असल्यामुळे आधुनिक विचारसरणी घेऊन मैदानात उतरली आहे, तर जुन्या पिढीने आपला जनसंपर्क, संघटनात्मक ताकद आणि राजकीय अनुभव पणाला लावल्याचे दिसून येत आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्प, गोदाकाठ विकास, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर नव्या पिढीचे उमेदवार ठोस भूमिका मांडताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार, थेट संवाद आणि तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून केला जात आहे.
तर विरोधकांकडून, 'राजकारण हे वारशावर नव्हे, तर कामावर चालले पाहिजे', अशी टीका केली जात असल्यामुळे निवडणुकीत रंगत बघावयास मिळत आहे. त्यामुळे दुसऱ्या पिढीतील उमेदवारांसमोर केवळ कुटुंबाच्या नावावर मते मिळवण्यापेक्षा स्वतःचे कर्तृत्वा आणि विकासाची स्पष्ट दृष्टी सिद्ध करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
तर काही प्रभागांत ज्येष्ठ नेत्यांनी स्वतः बाजूला ठेवत आपल्या पुढच्या पिढीला संधी दिली आहे. परिणामी अनेक प्रभागांमध्ये पारंपरिक नेते आणि तरुण उमेदवारांमध्ये थेट लढत रंगण्याची शक्यता आहे.. अनुभवाचा वारसा आणि नव्या विचारांची ऊर्जा यांचा संगम असलेली ही नाशिक महापालिका निवडणूक शहराच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे. मतदार नवे नेतृत्व स्वीकारणार की, अनुभवी हातांनाच संधी देणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
नेते व त्यांची नवी पिढी
दिनकर पाटील अमोल पाटील सुधाकर बडगुजर - दीपक बडगुजर उद्धव निमसे रिद्धेश निमसे दशरथ पाटील प्रेम पाटील हिरामण खोसकर - इंदुमती खोसकर लक्ष्मण सावजी नूपुर सावजी मुशिर सय्यद आदिना सय्यद