नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला सुरूवात झाली आहे. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत मतदान केंद्रांचीही संख्या वाढणार असल्याने मतदान केंद्रांची निश्चिती करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेच्या निवडणूक शाखेने बांधकाम विभाग तसेच सहाही विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
येत्या जानेवारीत महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी प्रभागरचनेची कार्यवाही पूर्ण झाली असून मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देखील निवडणूक आयोगाने जारी केला आहे. त्यानुसार महापालिकेतील निवडणूक शाखेमार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीकोनातून निवडणूक शाखेने शहर अभियंता संजय अग्रवाल तसेच सहाही विभागीय अधिकाऱ्यांना पत्र जारी करत मतदान केंद्र निश्चितीच्या सूचना दिल्या आहेत.
गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. याबाबत प्रशासन विभागाने पूर्वकल्पना देऊन मतदान केंद्र जागा निश्चित करण्याविषयी कळवले आहे. त्यानुसार १६०० मतदान केंद्र निश्चित करण्याबाबत प्रशासन विभागाने सूचित केले. प्रारुप मतदार यादीवर आलेल्या हरकती व सूचनांवर कार्यवाही करत अंतिम मतदार यादीनुसार त्रिसदस्यीय प्रभागांसाठी १०० ते १००० आणि चार सदस्यीय प्रभागांसाठी ८०० ते ९०० (१० टक्के कमी जास्त) मतदान होईल, अशी शक्यता निवडणूक शाखा तसेच प्रशासन विभागाने व्यक्त केली आहे.
केंद्रांची यादी २ डिसेंबरपर्यंत
२८ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदान केंद्रांविषयीची कार्यवाही करुन मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी २ डिसेंबरपर्यंत सादर करावी, अशी सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्र निश्चिती करताना संबंधित मतदान केंद्रांवर जोडावयाच्या मतदारांची कमाल संख्या निश्चित करुन कोणत्या मतदार केंद्रावर कोणत्या ठिकाणचे मतदार जोडावयाचे याविषयी माहिती तयार करण्याबाबत पूर्व तयारी करण्याची सूचना पत्रादारे करण्यात आली आहे.