नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर सभा घेणार असून, नाशिक येथे १२ जानेवारीला सभा घेणार आहेत. नाशिककरांचा सर्वांगीण विकास हा आमचारा नारा असून, आम्ही जनतेत जाणार आहोत.
भाजपसमवेतची युती का तुटली ते नाशिककरांच्या दरबारात जाऊन लवकरच सांगणार असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. मंत्री भुसे यांनी शिवसेना कार्यालयात रविवारी (दि. ४) पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर मंत्री भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री भुसे म्हणाले की, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेची तारीख निश्चित झाली आहे. याशिवाय खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत यांच्या सभांचे देखील नियोजन सुरू आहे.
नाशिककरांचा सर्वांगीण विकास हा युतीचा नारा असणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने काम पूर्ण करणार आहोत. आमच्या त्र्यंबकमध्ये काम सुरूही झाले आहे. शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांची सत्ता येणार असून, महापालिकेवर भगवा फडकेल अन् नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शहरातील काही प्रभागांत ५-१० इच्छुक उमेदवार होते. तेथे मार्ग काढणे कठीण झाले. यात अनेक नवे प्रवेश झाले. त्यामुळे २-३ ठिकाणी आमचे लोक नाराज आहेत. मात्र, सर्व एकत्र प्रचारात उतरतील. भाजपसमवेत आमची महायुती होईल. त्यादृष्टीने दोन ते तीन दिवस चर्चा झाल्या. मात्र, नेमके कुठे बिनसले हे आम्ही नाशिककरांच्या दरबारात जाऊन सांगणार आहोत, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. यावेळी आमदार किशोर दराडे, माजी खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते
मुंबईत मराठीच महापौर
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत मराठी महापौर होणार असल्याचे जाहीर केले. त्यावर विचारले असता मंत्री भुसे म्हणाले की, शिवसेना आणि भाजपची मुंबईत युती आहे. उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हिंदू आणि मराठीच महापौर होणार, असे यापूर्वीच सांगितले आहे. मुंबईच्या बाहेर मराठी माणूस फेकला गेला आहे, त्यांना रोजगार, घर कसे मिळतील अशा योजना राज्य सरकारने केल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.