नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणूक प्रचाराला वेग आला असून, प्रत्येक पक्ष व उमेदवार आपला प्रचार प्रभावी करण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवित आहे. त्यात महिला प्रचारकांद्वारे गृहभेटीवर अधिक भर दिला जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरातील गल्ली-बोळात महिला प्रचारकांची संख्या सर्वाधिक दिसत आहे. त्यातून महिलांना इतर कामांपेक्षा सध्या प्रचार कामातून चांगला रोजगार उपलब्ध होत आहे.
निवडणुका म्हटले की, प्रचार आलाच. प्रचाराशिवाय निवडणूक अशक्यच. यंदा नवे-जुने उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दिग्गज नेते व राजकीय पक्षाचे पाठबळ उमेदवारांमागे आहे. असे असले, तरी उमेदवाराने आतापर्यंत काय कामे केली. तसेच भविष्यात प्रभागात काय विकास करणार? पक्षाने आतापर्यंत गोरगरिबांसाठी काय योजना राबविल्या? पक्षाच्या नेत्यांचे जनसामान्यांसाठीचे योगदान यासह उमेदवाराचे कार्य मतदारांमध्ये बिंबविण्यासाठी जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत.
त्या जाहीरनाम्यातील मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी घरोघरी प्रचाराला विशेष महत्त्व आहे. एरवी जाहीर सभा, कॉर्नर सभांमधून उमेदवारांचा प्रचार होईल व होत आहे. मात्र, ज्याचा जास्त गाजावाजा, त्याची हवा असे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक उमेदवार प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत आपले प्रचार साहित्य पोहोचविण्यास प्रयत्नशील आहे.
उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रभागातून प्रचार रॅली काढत आहेत. त्यात गर्दी असणे म्हणजे संबंधित उमेदवाराची हवा टाइट असणे असेही मानले जाते. त्यामुळे प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपल्या प्रचार रॅलीत गर्दी करण्यासाठी महिला कार्यकर्त्यांना प्राधान्य देत आहेत. कारण महिला कार्यकर्त्यांमध्ये काहीही कारण सांगून प्रचार रॅली संपेपर्यंत जात नाहीत. प्रामाणिकपणे कामे करतात. त्यामुळे अनेक उमेदवारांच्या प्रचारात महिलांच्या गर्दीला प्राधान्य दिले जात आहे. त्यातून महिलांना इतर रोजगारापेक्षा चांगला रोजगारही मिळत आहे.
सकाळी एका, तर सायंकाळी दुसऱ्याच्याच रॅलीत
महिला कार्यकर्त्या रोजंदारीने प्रचारासाठी येत असल्यामुळे सकाळी एखाद्या पक्षाच्या प्रचार रॅलीत मात्र सायंकाळी दुसऱ्याच उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे महिला त्याच मात्र वेगवेगळे पक्ष व उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे हा विषय चर्चेचा झाला आहे. प्रचार करणाऱ्या महिलांना कोणता झेंडा घेऊ हाती? असा प्रश्न पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण त्यांना जेथे पैसा मिळेल, त्याचा झेंडा हाती, असे चित्र आहे.