नाशिक : महापालिका निवडणूक निकालानंतर आता स्वीकृत सदस्यपदासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची फिल्डिंग लागली आहे. दहा स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार असल्याने भाजपकडे सहा, शिवसेनेचे दोन तर उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला स्वीकृत सदस्यपदाची एक जागा मिळणार आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 72 जागांवर विजय मिळवत महापालिकेत सत्तास्थापनेची तयारी केली आहे. स्पष्ट बहुमत असल्यामुळे नाशिकचा महापौर आणि स्थायी समितीचा सभापती भाजपचाच होणार हे आता स्पष्ट झाले आहे. परंतु या निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या अथवा कमी फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांनी स्वीकृत सदस्यपदाच्या माध्यमातून महापालिकेत एन्ट्री करण्याची तयारी केली आहे.
स्वीकृत म्हणून सदस्य नियुक्ती करताना शिक्षण, आरोग्य किंवा त्या-त्या विषयातील तज्ज्ञ असावा, असे संकेत आहेत. परंतु राजकीय सोईच्या दृष्टीने पक्षांकडून स्वीकृतसाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. राजकीय पक्षांकडून आयुक्त व आयुक्तांमार्फत महापौरांकडे स्वीकृत सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव पाठविलो जातो. महापालिकेच्या सभागृहात भाजपचे 72 सदस्य आहेत. एकूण सदस्यांच्या दहा टक्के सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा नियम आहे. त्यामुळे 72 गुणिले दहा भागिले एकूण सदस्य संख्या 122 या प्रमाणे भाजपचा गुणांक 5.90 होतो.
पाच सदस्य निश्चित झाल्यानंतर उर्वरित .90 हि संख्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने पूर्णांकात एक ग्राह्य धरली जाते. त्यामुळे भाजपचे सहा सदस्य स्वीकृत होतील. शिवसेना, उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेसची अपूर्णांकातील संख्या 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने पहिला आकडा म्हणजेच शिवसेना दोन, उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक असे स्वीकृत सदस्य नियुक्त होईल.
स्वीकृतचा फॉर्म्युला
(निवडून आलेले नगरसेवक गुणिले दहा टक्के भागिले एकूण सदस्य 122 सदस्य संख्या)
भाजप - 5.90 (सहा)
शिवसेना - 2.13 (दोन)
उबाठा- 1.22 (एक)
राष्ट्रवादी काँग्रेस- 0.32 (एक)