नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागांमधील १२२ जागांकरिता येत्या १५ जानेवारीला होत असलेल्या निवडणुकीसाठी १५३२ उमेदवारांनी २३५६ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. बुधवारी (दि.३१) झालेल्या अर्ज छाननीत यापैकी २७७ उमेदवारी अर्ज विविध कारणांमुळे बाद ठरले आहेत. तर, २०७९ अर्ज वैधरीत्या निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत.
गुरुवारी (दि. १) उमेदवारी अर्ज माघारीसाठी मुदत आहे. बंडखोरांना रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती.
अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत होती. या मुदतीत एकूण १५३२ उमेदवारांनी २३५६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात तब्बल ५१८ उमेदवार विविध राजकीय पक्षांचे, तर उर्वरित १०१३ उमेदवार अपक्ष आहेत.
बुधवारी (दि.३१) दहाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज छाननी पार पडली. यात प्रभाग २१ मधील ११० उमेदवारी अर्जापैकी सर्वाधिक ३९ अर्ज बाद ठरविण्यात आले. त्याखालोखाल प्रभाग १३ मधील ९५ पैकी ३६, प्रभाग १० मधील १११ पैकी ३३, प्रभाग २५ मधील ९२ पैकी ३०, प्रभाग २८ मधील ६७ पैकी २६, प्रभाग २० मधील ७४ पैकी २५, प्रभाग २६ मधील ७५ पैकी १७, तर प्रभाग २२ मधील ५० पैकी १५ उमेदवारी अर्ज बाद ठरले.
प्रभाग १४ मध्ये सर्वाधिक ११९ अर्ज
उमेदवारी अर्ज छाननीनंतर प्रभाग १४ मध्ये सर्वाधिक ११९ उमेदवारी अर्ज रिंगणात आहेत. त्याखालोखाल प्रभाग २९ मध्ये १०० उमेदवारी अर्ज आहेत. गुरुवार (दि.१) पासून उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असून, बंडोबांना थंडोबा करण्यासाठी राजकीय पक्ष तसेच उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे.