नाशिक : जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीत शुक्रवारी (दि.21) माघारी झाल्यानंतर एक हजार ८९ जणांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. नगराध्यक्षांच्या ११ जागांसाठी ६१ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून नगरसेवकांच्या २६६ जागांसाठी १ हजार २८ जण नशीब आजमावत आहे. नगराध्यक्षपदासाठी चांदवडमध्ये सर्वाधिक 11 यापाठोपाठ मनमाड 9, त्र्यंबकेश्वरमध्ये 8 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात होणार आहे.
जिल्ह्यातील 11 नगरपरिषदाकरीता निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी (दि.21) माघारीचा अंतिम दिवस होता. अनेक ठिकाणी माघारी संदर्भात नाट्यमय घडामोडी घडल्या. दुपारी तीनपर्यंत हे माघारी नाट्य सुरू होते.
नगराध्यक्षपदासाठी १०६ जणांचे तर नगरसेवकपदासाठी एकूण १ हजार ३४४ जणांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते. १९ आणि २० नोव्हेंबर या तीन दिवसात नगराध्यक्ष पदासाठीच्या ६ तर नगरसेवकपदासाठी ४८ जणांनी माघार घेतली. अखेरच्या दिवशी शुक्रवारी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक ३८ जणांनी तर नगरसेवकपदासाठी २६१ अशा एकूण २९९ इच्छुकांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी ६१ आणि नगरसेवकपदासाठी १ हजार २८ जण निवडणुकीच्या मैदानात आहेत.