Ramayan Theme Park 
नाशिक

Ramayan Theme Park | नाशिकमध्ये अवतरणार अयोध्या नगरी! आडगावमध्ये भव्य 'रामायण थीम पार्क' साकारणार

Ramayan Theme Park | सार्वजनिक खासगी भागीदारीतून प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा


नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील रामायणकालीन वारसाला आधुनिक पर्यटनाची जोड देण्यासाठी आडगाव येथील सर्व्हे क्रमांक ७७२ पैकी महापालिकेच्या आरक्षित क्षेत्रात 'रामायण थीम पार्क' उभारण्याचा प्रस्ताव नाशिक महापालिकेने पुढे आणला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत डिझाइन बिल्ट फायनान्स ऑपरेट ट्रान्सफर अर्थात 'डीबीएफओटी' तत्त्वावर हा प्रकल्प विकसित करण्याचे नियोजन आहे.

यासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करून विकासकाची निवड केली जाणार आहे.
नाशिकचा पंचवटी, सीतागुंफा, रामकुंड, श्रीकाळाराम मंदिर आणि गोदावरी नदीशी असलेला रामायणकालीन संबंध लक्षात घेऊन हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देश-विदेशातून येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी वर्षभर आकर्षण ठरणारे कायमस्वरूपी पर्यटनस्थळ निर्माण करण्याचा मनपाचा उद्देश आहे. मालमत्ता मुद्रीकरण समितीच्या दि. ११ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर विकसित करण्यास मान्यता देण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

तसेच दि. २२ जुलै २०२६ च्या शासन निर्णयाचा संदर्भ देत 'डीबीएफओटी' कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे प्रस्तावित आहे. खासगी गुंतवणूक, तांत्रिक कौशल्य आणि व्यावसायिक व्यवस्थापन माध्यमातून प्रकल्प उभारून निर्धारित कालावधीनंतर तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची 'डीबीएफओटी' पद्धत प्रस्तावित आहे.

पर्यटन मुक्काम वाढण्याची अपेक्षा:

नाशिक-त्र्यंबकेश्वर-पंचवटी-सप्तशृंगी-शिर्डी या धार्मिक पर्यटन पट्ट्यात येणाऱ्या पर्यटकांना अधिक काळ नाशिकमध्ये थांबवण्यास या प्रकल्पाची मदत होईल, असा मनपाचा दावा आहे. त्यातून हॉटेल, रेस्टॉरंट, वाहतूक, किरकोळ व्यापार तसेच इतर पर्यटनपूरक व्यवसायांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

स्थानिकांना रोजगार, व्यवसायाच्या संधी:

थीम पार्क बांधकामाबरोबरच त्याच्या संचालनाच्या टप्प्यात सुरक्षा, हॉस्पिटॅलिटी, खाद्यपदार्थ व पेय, हाऊसकीपिंग, तांत्रिक सेवा, वाहतूक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यटन सेवांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची लोककला, हस्तकला, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचाही उल्लेख प्रस्तावात आहे.

रामायणातील विविध प्रसंगांचा अनुभव:

प्रस्तावित थीम पार्कमध्ये रामायणातील विविध कांडे आणि प्रसंग आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहेत. बालकाण्ड, अयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, सुंदरकाण्ड आणि युद्धकाण्ड यांसह रामायणातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे थीम-आधारित सादरीकरण करण्याची संकल्पना आहे. ३६०-डिग्री इमर्सिव्ह डोम, ४ डी अनुभव, एआय-व्हीआर आधारित शो, प्रोजेक्शन मॅपिंग, थीम्ड आकर्षणे, ॲडव्हेंचर राइड्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्याची शक्यता प्रस्तावात व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय रॉयल ॲम्फीथिएटर, 'मोक्ष घाट', श्रीराम मंदिराची प्रतिकृती, लँडस्केप स्पिरिच्युअल स्पेसेस, फूड कोर्ट, रिटेल क्षेत्र, स्मृतिचिन्हांची दुकाने आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT