Nashik news 
नाशिक

Nashik news | तपोवन वृक्षतोडीवरील स्थगिती कायम

पुढील सुनावणी आता ६ एप्रिलला

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने शुक्रवारी (दि. २०) स्थगिती कायम ठेवत 'तपोवन वाचवा' चळवळीला मोठा दिलासा दिला. नाशिक मनपाने आपली बाजू मांडण्यासाठी लवादाकडे अतिरिक्त वेळ मागितला असून, पुढील सुनावणी ६ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे.

तपोवन परिसरातील पर्यावरणीय हानीबाबत प्रशासनाकडून न्यायालयीन आदेशांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचा आरोप करत याचिकाकर्ते अॅड. श्रीराम पिंगळे यांनी लवादाकडे स्वतंत्र अर्ज सादर केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणातील चौकशी अहवाल लवादासमोर सादर करण्यात आला असला, तरी तो सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याने पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच कपिला नदीकाठच्या वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या अर्जाची दखल घेत लवादाने संबंधित प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे.

नुकताच तपोवनप्रेमी नाशिककरांच्या वतीने अमित कुलकर्णी, राजू देसले यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. ही बातमी 'पुढारी'नेही लावून धरत प्रशासनाच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले होते. आता पुढील सुनावणीकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

याचिकाकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

१. १२ डिसेंबर २०२५ च्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल प्रतिवाद्यांना १० कोटी रुपयांचा संयुक्त दंड ठोठावावा.

२. दंडाची रक्कम संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक स्तरावर वसूल करावी.

३. जाणीवपूर्वक आदेशभंगाबाबत न्यायालयीन अवमानाची कारवाई सुरू करावी.

४. आदेशांचे पालन न झाल्यास दररोजच्या तत्त्वावर अतिरिक्त दंड आकारावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT