नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा आणि ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे नाशिक शहराकडे येणारे संभाव्य लोंढे लक्षात घेता, आगामी काळातील पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिकेने कमर कसली आहे. जलसंपदा विभागाकडून ६,३०० दशलक्ष घनफूट (दलघफू) पाणी आरक्षित करण्याची तयारी दर्शवण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात मिळणारे ५,५०० दलघफू पाणी शहराच्या गरजेच्या तुलनेत अपुरे ठरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून ८,२५० दलघफू पाण्याचा सुधारित प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. यासाठी २००९ मध्ये राज्य शासन आणि नाशिक महापालिकेत झालेला पाणी कराराचा आधार घेत वाढीव आरक्षणाची मागणी केली जाणार आहे.
नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून, तर काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
धरणांची मालकी जलसंपदा विभागाकडे असल्यामुळे दरवर्षी १५ ऑक्टोबर ते ३१ जुलै या कालावधीसाठी पाणी आरक्षण निश्चित केले जाते. यंदा महापालिकेने गंगापूर धरणातून ५,४४८ दलघफू, मुकणे धरणातून १,७०० दलघफू आणि दारणा धरणातून २३० दलघफू असे एकूण ७,३७० दलघफू पाणी आरक्षित करण्याची मागणी केली होती.
मात्र, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या बैठकीमध्ये जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांनी महापालिकेची मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याऐवजी बाष्पीभवनासह ६,३०० दलघफू पाणी आरक्षित करता येईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्यक्ष वापरासाठी ५,५०० दलघफू पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महापालिकेने मागणी केलेल्या पाण्याच्या तुलनेत २५ टक्के कपात होण्याची शक्यता आहे. ही कपात शहराच्या पाणीपुरवठाच्या दृष्टीने चिंताजनक मानली जात आहे. १,२५० दलघफू पाण्याची अतिरिक्त मागणी जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात २००९ मध्ये झालेल्या करारानुसार नाशिक शहरासाठी सुमारे सात हजार दलघफू पाणी आरक्षित ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते. या कराराचा आधार घेत, महापालिका आता अतिरिक्त १,२५० दलघफू पाण्याची मागणी करणार आहे.
त्यामुळे एकूण ८,२५० दलघफू पाणी आरक्षित करण्यासाठी सुधारित प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.भावीकांची वाढती संख्या आणि दुष्काळामुळे ग्रामीण भाग, मराठवाडा व खानदेशातून नाशिककडे होणारे संभाव्य स्थलांतर विचारात घेणे आवश्यक आहे. या परिस्थितीत लोकसंख्येत सुमारे तीन लाखांनी वाढ होण्याचा अंदाज असून, त्यानुसार पाण्याची गरजही वाढणार आहे.
हिवाळ्यातच पाणी उपशात वाढ
साधारणपणे शहरासाठी दररोज ५८० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जातो. मात्र, यंदा हिवाळ्यातच उन्हाची तीव्रता जाणवू लागल्यामुळे दिवाळीच्या काळात पाण्याची मागणी वाढल्यामुळे दररोज ६१० दशलक्ष लिटर पाणी धरणामधून उचलावे लागत आहे. सध्याची वाढती मागणी, आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि संभाव्य लोकसंख्यावाढ यामुळे नाशिकच्या पाणी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सुधारित प्रस्तावाला जलसंपदा विभागाकडून कितपत प्रतिसाद मिलतो, याकडे लक्ष लागले आहे.