नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये सोमवार (दि.३०) पासून वॉटर बेल उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दर दोन तासांनी पाणी पिण्यासाठी बेल वाजविणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या सुमारे १०० शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. नाशिकमध्ये तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत शरीरात पुरेसे पाणी असणे आवश्यक असल्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास निर्जलीकरण, चक्कर, थकवा तसेच इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. काही वेळा मुतखडासारख्या आजारांचा धोकादेखील वाढतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित पाणी पिण्याची सवय लावणे गरजेचे आहे. घरच्या तुलनेत शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होते. यावर उपाय म्हणून शालेय वेळेत दर दोन तासांनी बेल वाजवून विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून दिली जाणार आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पाणी पिण्याची सवय विकसित होऊन उष्माघातासारख्या आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे. मात्र, आवश्यक तेवढेच पाणी पिण्याचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
जबाबदारी मुख्याध्यापकांवर
या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शाळांमधील मुख्याध्यापक व पर्यवेक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची पाण्याची बाटली शाळेत आणून वेळोवेळी पाणी पिण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.