नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे मानधन तत्त्वावर भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने १८ संवर्गातील एकूण २१२ पदांची भरती जाहीर केली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ नर्स, एएनएम, फार्मासिस्ट यांच्यासह विविध तांत्रिक पदांचा समावेश आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या www.nmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून तो आवश्यक कागदपत्रांसह सादर करायचा आहे. अर्ज स्वीकारण्यास मंगळवार (दि. २४) पासून सुरुवात झाली असून, दि. ९ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
अर्ज नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात, तिसरा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेचे गुण आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे.
दरम्यान, संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि तांत्रिक प्रमाणपत्रे असणे बंधनकारक आहे. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असून, त्यातून नियमित सेवेत कायम होण्याचा अधिकार मिळणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
२४/११/२०२६ : अर्ज सुरू
०९/१२/२०२६ : अंतिम मुदत
५.०० पर्यंत : अंतिम वेळ
संकेतस्थळ : www.nmc.gov.in
अर्जाचे ठिकाण : सार्वजनिक आरोग्य विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.
वैद्यकीय अधिकारी - १५, शल्यचिकित्सक - २, स्त्रीरोग तज्ज्ञ - ५, अस्थिरोग तज्ज्ञ - २, बालरोग तज्ज्ञ - ५, क्ष-किरण तज्ज्ञ - २, बधिरीकरण तज्ज्ञ - २, त्वचारोग तज्ज्ञ - २, मानसोपचार तज्ज्ञ - २, फिजिओथेरपिस्ट - २, स्टाफ नर्स - ७९, ए. एन. एम. - ५७, फार्मासिस्ट - २५, कुष्ठरोग तंत्रज्ञ - ४, शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञ - २, ईसीजी तंत्रज्ञ - २, बायोमेडिकल इंजिनिअर - १, संगणक ऑपरेटर - १०, एकूण - २१२.