नाशिक : एकीकडे सिंहस्थ कामांची लगबग सुरू असताना शहरातील रस्त्यांवरील खड्डे मात्र कायम असल्याने भाजपच्या तिन्ही आमदारांनी मंगळवारी(दि.२५) महापालिका आयुक्तांची भेट घेत प्रशासनाला धारेवर धरले. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेड च्या वतीने सुरू असलेले रस्त्यांचे खोदकाम तातडीने बंद करण्याच्या सूचना करताना कॉलनी अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी देखील त्यांनी केली. दरम्यान, आयुक्त मनीषा खत्री यांनी एमएनजीएलला दिलेल्या परवानगीनुसार कामे पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे.
पावसाळा संपल्यानंतरही रस्त्यांवरील खड्डे मात्र कायम आहेत. यासंदर्भात नागरिक आमदारांकडे तक्रारी करत आहेत. या तक्रारींची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे यांनी महापालिका आयुक्त खत्री यांनी भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला. आमदार फरांदे यांनी महात्मा नगर व गंगापूर रोड भागात काही रस्त्यांची पाहणी करून तेथे चुकीच्या पद्धतीने पॅचवर्क मारण्याचे निदर्शनास आणून दिले. खड्ड्यांमुळे अनेक भागात अपघात होऊन नागरिक जायबंदी होत असल्याची तक्रार करण्यात आली.
आमदार ढिकले यांनी खड्ड्यांसंदर्भात प्रशासनाकडून आलेली आकडेवारी निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप केला. रस्त्यांवरील खड्डे शंभर टक्के बुजविण्याबरोबरच कॉलनी अंतर्गत रस्त्यांची देखील दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा विधिमंडळाचे अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्याचा इशारा दिला. महापालिका, महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी, महावितरण व दूरसंचार निगम कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे शहर खड्ड्यांच्या विळख्यात सापडल्याची तक्रार आ. हिरे यांनी केली.
यावेळी आयुक्त खत्री यांनी रस्ते खोदाईसाठी एमएनजीएल कंपनीला १५ दिवसांचा अल्टीमेटम देत त्यानंतर शहरात कुठलेही रस्ते फोडू दिले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले. कॉलनी अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती हाती घेतली जाईल त्यासाठी प्रस्ताव तयार करून आमदारांना सादर करू. शासन किंवा नगरविकास विभागाकडून त्या रस्त्यांसाठी निधी द्यावा, असेही आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह सहा विभागातील कार्यकारी अभियंते व उप अभियंते उपस्थित होते.
आमदारांचे असे आहेत आक्षेप
प्रशासनाकडून खड्डे बुजविल्याची खोटी माहिती
शासन आदेशाप्रमाणे एकही खड्डा बुजवला नाही.
लायबिलिटी पिरियडमधील रस्ते ठेकेदारांकडून दुरूस्त नाही
खड्डे दुरूस्तीच्या नावावर अधिकाऱ्यांकडून निधीची उधळपट्टी
फिल्डवर न जाता अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांची पाठराखण
नवीन रस्ते करण्यापूर्वी खड्डे बुजवावे जाते.
शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास विधानसभेत प्रश्न मांडला जाईल. प्रशासनाला गांभीर्य नाही. अधिकाऱ्यांच्या चार चाकी गाड्या काढून त्यांना दुचाकी वाहनावर शहरातून फिरवावे.प्रा. देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य.
खड्ड्यांबाबत अधिकाऱ्यांकडून खोटी माहिती सादर केली जाते. प्रत्यक्षात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुख्य रस्त्यांबरोबरच कॉलनी अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करावी.ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व.
नवीन रस्त्यांचे खोदकाम केले जाते. महापालिका, महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी, महावितरण व दूरसांचार निगम कंपनीच्या अधिकाऱ्यांमद्ये समन्वय नसल्यामुळे महापालिकेच्या निधीचा अपव्यय होत आहे.सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम.