नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापौर-उपमहापौर तसेच गटनेत्यांच्या निवडीनंतर महापालिकेत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या राजवटीला प्रारंभझाला आहे. या पदाधिकाऱ्यांच्या दालनांसाठी स्वीय सहायकांसह लिपिक, शिपाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. नगरसचिव विभागाने प्रशासन उपआयुक्तांकडे ६० कर्मचाऱ्यांची मागणी नोंदवली आहे. प्रशासकीय राजवटीच्या काळात नगरसचिव विभागातील या कर्मचाऱ्यांच्या अन्य विभागांत बदल्या करण्यात आल्या होत्या. ते कर्मचारी आता पुन्हा एकदा नगरसचिव विभागात परतणार आहेत. दरम्यान, गेल्या पावणेचार वर्षांत बरेचसे कर्मचारी निवृत्त झाले असल्याने रिक्त जागांची वाढलेली संख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. नाशिक महापालिकेत फेब्रुवारी २०२२ मध्ये लोकशाही राजवट संपुष्टात आल्यानंतर ओबीसी आरक्षण व प्रभागरचनेतील न्यायालयीन वादात सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रशासकीय राजवट लागली होती. या कालावधीत पदाधिकारी, नगरसेवक नसल्यामुळे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महासभा, स्थायी समितीच्या सभा होत होत्या. गटनेत्यांची, पदाधिकाऱ्यांची दालने कुलूपबंद होती. त्यामुळे या कार्यालयात दिमतीला असलेल्या कर्मचाऱ्यांची अन्य विभागांत बदली करण्यात आली होती. तब्बल पावणेचार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. लोकशाही राजवट परतली आहे. महापौर उपमहापौरांची तसेच गटनेत्यांची निवड झाली आहे. त्यापाठोपाठ स्थायी समिती सभापती, शिक्षण समिती सभापती, महिला व बालकल्याण, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, शहर विकास समिती व परिवहन समिती या पदाधिकाऱ्यांचीही निवड होणार आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र दालन व त्या दालनात स्वीय सचिव, आवक-जावक नोंद करण्यासाठी लिपिकांची, शिपाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. त्यामुळे नगरसचिव विभागाने प्रशासन विभागाकडे कर्मचाऱ्यांची मागणी नोंदवली आहे.
मर्जीतील कर्मचाऱ्यांना मिळणार संधी
महापौर कार्यालय, निवासस्थान रामायण, उपमहापौर व स्थायी समिती सभापती, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते तसेच गटनेत्यांकडे स्वीय सहायक, लिपिक, शिपाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच कर्मचारी दिले जाणार आहेत. त्यामुळे मर्जीतील कर्मचाऱ्यांना संधी मिळणार आहे.