Dengue File Photo
नाशिक

Nashik Dengue News | नाशिकमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या 56 वर; महापालिका अलर्ट मोडवर!

Nashik Dengue News | महापालिकेतर्फे आजपासून डेंग्यू तपासणी मोहीम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी येत्या बुधवार (दि. ५) पासून २५ ऑगस्टपर्यंत शहरात डेंग्यू-मलेरिया तपासणी मोहीम राबविली जाणार असून, यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रनिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत.

दरवर्षी पावसाळा आला की, कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या जीवघेण्या आजारांची लागण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती नावाच्या मादी डासांची पैदास स्वच्छ पाण्यात होते.

पावसाळ्यात घरांच्या परिसरात नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स, भंगार साहित्य तसेच शोभेच्या वनस्पतींच्या कुंड्यांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती होते. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण केले जाणार आहे.

या मोहिमेअंतर्गत घरोघरी पाण्याचे कंटेनर (भांडी) तपासले जाणार आहेत. या पाणीसाठ्यांमध्ये डेंग्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आल्यास भांडी रिकामी करून ॲबेटिंग प्रक्रिया केली जाईल. घरातील फ्रीज, कुलर तसेच गच्ची, सज्जा, झाडांच्या कुंड्या आदी ठिकाणी साचलेले पाणी वाहते केले जाईल. घरात आजारी आढळणाऱ्या संशयित व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासणी करून पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तींवर उपचार करण्यात येतील, अशी माहिती प्रभारी आरोग्य-वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी दिली.

डेंग्यू रुग्णसंख्या ५६ वर

शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जुलैच्या गेल्या महिनाभरातच डेंग्यूचे तब्बल ३३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील डेंग्यूबाधितांचा एकूण आकडा ५६ वर गेला आहे. ऑगस्टमध्येही डेंग्यूची लागण मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT