नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation | 'बॉण्ड'च्या माध्यमातून शहर विकासनिधीला बळ : मुख्यमंत्री

Nashik Municipal Corporation | नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकांना आपल्या विविध विकासकामांसाठी भांडवली बाजारात बॉण्ड जारी करून निधी उभारता येतो. नाशिक महापालिकेप्रमाणे इनोव्हेटिव्ह फंड निर्माण करून विकासाला निश्चितच निधीचे बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सिंहस्थकामांमुळे नाशिक शहर विकसित महानगरांच्या श्रेणीमध्ये आणण्यास मदत होणार असून, यामुळे पुढील काळात नाशिक हे गुंतवणुकीचे चुंबक म्हणून उदयास येईल, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिंगिंग बेल वाजवून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, नाशिक कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, माजी महापौर रंजना भानसी, सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महापालिकेने एकाच आर्थिक वर्षात प्रथम खासगी प्लेसमेंट आणि आता सार्वजनिकरीत्या असे दोन्ही बॉण्ड जारी करून भांडवली बाजारात प्रवेश केला आहे भांडवली बाजाराच्या माध्यमातून महापालिकांनी निधी उभा करून लोकोपयोगी कामे केली पाहिजेत. यासाठी केंद्र शासनाने योजनाही घोषित केली आहे.

पहिल्या टप्प्यात २०० कोटी रुपयांपर्यंतचे बॉण्ड्स काढण्याकरिता केंद्राने मान्यता दिली होती. त्याचे यश बघता, केंद्रीय अर्थसंकल्पात या बॉण्डची मर्यादा एक हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. याकरिता देण्यात येणारे प्रोत्साहन मूल्यदेखील २०० कोटी रुपयांपर्यंत करण्यात आले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक महानगरक्षेत्रात जवळपास २५ हजार कोटींची विकासाची कामे सुरू करण्यात आली आहेत. या विकासकामांमुळे निर्माण होणारी व्यवस्था सिंहस्थासाठी नाही, तर नाशिक शहर विकसित महानगरांच्या श्रेणीमध्ये आणण्यास कारणीभूत ठरणार आहे.

त्यामुळे पुढील काळात नाशिक हे गुंतवणुकीचे चुंबक म्हणून उदयास येणार आहे, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आशिष चौहान यांनी मनोगत व्यक्त केले. आयुक्त मनीषा खत्री यांनी बॉण्डविषयी माहिती दिली. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.

बॉण्डच्या निधीतून ही कामे होणार

ग्रीन बॉण्डमध्ये मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथे क्षमता वाढविणे, विल्होळी येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र, विल्होळी नवीन जलशुद्धीकरण केंद्र ते साधुग्रामपर्यंत मुख्य गुरुत्ववाहिनी टाकणे आदींचा समावेश आहे. प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे कुंभमेळ्याच्या काळात तसेच त्यानंतरही नाशिक शहराला स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आहे.

पाणीगळती २० टक्क्यांवर येणार

केंद्र शासनाच्या प्रोत्साहन मूल्य आणि अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून नाशिक महापालिकेला बिनव्याजी पैसे मिळणार आहेत. या बॉण्डच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीद्वारे नाशिक महापालिका सार्वजनिक हिताचे पाणीपुरवठा संबंधित प्रकल्प पूर्ण करणार आहे. यामुळे पाण्याची गळती ४७ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT