नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागातील १८६ फायरमन व वाहनचालकांच्या रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी व शारीरिक चाचणी परीक्षेनंतर भरतीची निवड यादी येत्या आठवडाभरात प्रसिद्ध केली जाणार आहे. नियुक्ती प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
दरम्यान, लेखी परीक्षा दिलेल्या १,४६२ पैकी १,२२१ जणांनी शारीरिक चाचणी परीक्षेत प्रविष्ट होत भरतीसाठीचा दावा कायम ठेवला आहे. शारीरिक चाचणी परीक्षेस गैरहजर राहिलेले २४१ उमेदवार या भरतीस अपात्र ठरले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अग्निशमन दल सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट रद्द करून, अग्निशमन विभागातील फायरमन व वाहनचालकांच्या १८६ पदांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे भरतीप्रक्रिया राबविली जात आहे.
यासाठी फेब्रुवारीअखेर नाशिकसह राज्यातील १३ प्रमुख शहरांतील केंद्रांमध्ये १२० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, पावसाळ्यामुळे शारीरिक चाचणी परीक्षा लांबणीवर पडली होती. पावसाळा संपुष्टात आल्यानंतर प्रशासनाने दि. २ ते ४ नोव्हेंबर या दरम्यान शारीरिक चाचणी परीक्षा घेतली.
या परीक्षेस १,४६२ पैकी १,२२१ उमेदवार हजर होते. २४१ जण गैरहजर राहिल्याने भरती प्रक्रियेतून ते बाद झाले आहेत. आता लेखी व चाचणी परीक्षेचे गुण एकत्र करीत अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.
नाशिक शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अग्निशमन विभागात ४२८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना, जेमतेम १०० कर्मचारी कार्यरत आहेत. अग्निशमन विभागात गेल्या २५ वर्षांपासून सरळसेवेतून भरती झालेली नाही.
उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे मोठी दुर्घटना घडल्यास अनर्थ होण्याची भीती कायम आहे. त्यामुळे नवीन भरतीमुळे अग्निशमन दलाला मोठा आधार मिळणार आहे.