नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation | शासकीय कार्यालयांचे फायर ऑडिट कागदावरच

Nashik Municipal Corporation | महापालिका अग्निशमन विभागाच्या आवाहनाला केराची टोपली

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका हद्दीतील शासकीय-निमशासकीय तसेच व्यावसायिक इमारतींना वर्षातून दोन वेळा फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे. फायर ऑडिटचा अहवाल सादर न करणाऱ्या आस्थापनांचा पाणी व वीजपुरवठा खंडित करणार असून, इमारत सील करण्याचा इशारा महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी दिला होता.

खासगी इमारतींचे तर सोडाच. पण, शासकीय-निमशासकीय कार्यालयांनीदेखील महापालिकेच्या या इशाऱ्याला केराची टोपली दाखवली आहे. गेल्या दोन महिन्यांत एकाही शासकीय-निमशासकीय कार्यालयाच्या फायर ऑडिटचा अहवाल महापालिकेच्या अग्निशमन विभागाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आता महापालिका संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य शासनाने राज्यात २००८ पासून महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व सुधारित अधिनियम २०२३ व नियम २००९ हे लागू केले आहेत. या अधिनियमातील तरतुदीनुसार विविध स्वरूपाची कार्यालये, आस्थापना तसेच इमारतींच्या वापराच्या अनुषंगाने अग्निप्रतिबंधक उपायोजना करणे तसेच संबंधित उपाययोजना दुरुस्त व कार्यक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्थात फायर ऑडिट अहवाल वर्षातून दोन वेळा सादर करणे बंधनकारक आहे.

त्यानुसार महापालिकेच्या अग्निशमन प्रतिबंधक विभागाने अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची पूर्तता न करणाऱ्या आस्थापनांचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याबरोबरच इमारत सील करण्याचा इशारा महापालिकेतर्फे दोन महिन्यांपूर्वी देण्यात आला होता. खासगी आस्थापनांकडून महापालिकेला अल्प प्रतिसाद मिळाला, मात्र एकाही शासकीय-निमशासकीय कार्यालयाकडून फायर ऑडिटचा अहवाल प्राप्त झालेला नाही. महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या इमारतींना फायर ऑडिट बंधनकारक

शासकीय-निमशासकीय कार्यालये, हॉटेल्स, लॉजेस, रेस्टॉरंट, पेट्रोलपंप, रुग्णालये, मॅटर्निटी होम, नर्सिंग होम, शैक्षणिक इमारती (बहुमजली शाळा, कॉलेज, क्लासेस), व्यावसायिक इमारती (शॉपिंग सेंटर, मॉल्स, ऑफिसेस), सार्वजनिक वापराच्या इमारती (नाट्यगृहे, सिनेमागृह), औद्योगिक इमारती व गोदाम, १५ मी. पेक्षा जास्त उंचीच्या रहिवासी इमारती, सर्व प्रकारच्या संमिश्र वापराच्या इमारती, सर्व क्लासेसच्या इमारती.

तर तीन वर्षापर्यंत कारावास

कायद्यांतील तरतुदींनुसार फायर ऑडिटचा अहवाल सादर न करणाऱ्या आस्थापनांना दखलपात्र व अदखलपात्र अपराध म्हणून गुन्हा नोंदविल्यास सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत सक्षम कारावास व २० ते ५० हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT