नाशिक महापालिकेसाठी उद्या मतसंग्राम (Pudhari Photo)
नाशिक

Nashik Municipal Elections : नाशिक महापालिकेसाठी उद्या मतसंग्राम

तयारी पूर्ण : 1,563 मतदान केंद्रांवर 13.60 लाख मतदार बजावणार हक्क

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पावणेचार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी (दि.15) प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. मतदानासाठी 1,563 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. 13 लाख 60 हजार 722 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांसह अपक्ष 735 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेच्या वादामुळे महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे निर्देश देत निवडणूक आयोगाला कालमर्यादा आखून दिल्याने निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक प्रक्रियेला महिनाभराची मुदत दिली गेली. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यानंतर 31 डिसेंबरला छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली गेली.

1 व 2 जानेवारीस माघारीची मुदत देण्यात आली होती. यानंतर 3 जानेवारीपासून प्रत्यक्ष प्रचारास सुरुवात झाली. केंद्र व राज्यातील सत्तेत महायुती असली तरी महापालिकेची निवडणूक भाजपने स्वबळावर लढवत 122 पैकी 118 ठिकाणी उमेदवार निवडणूक रिंगणात उरवले. मात्र, एबी फॉर्मच्या गोंधळात भाजपला तीन अपक्षांना पुरस्कृत करण्याची वेळ आली. महायुतीत भाजपने रस न दाखवल्याने शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसने पान 8 वर (अजित पवार गट) एकत्र येत युती केली. दुसरीकडे शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षानेही महाविकास आघाडी करत भाजपसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीतील 735 उमेदवारांपैकी 527 उमेदवार राजकीय पक्षांचे तर उर्वरित 208 उमेदवार अपक्ष निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत.

या नेत्यांनी गाजवला निवडणूक फड

उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आमदार चित्रा वाघ, शिवसेना शिंदे गटातर्फे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, दादा भुसे, हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे सुनील तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, शिवसेनेतर्फे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, मनसेतर्फे राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये सभा घेत निवडणुकीचा फड गाजवला.

महाजन, भुसे, भुजबळ तळ ठोकून

नाशिक महापालिकेत ‌‘100 प्लस‌’चा नारा देणारे भाजपचे प्रभारी तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. त्याचप्रमाणे शिंदे सेनेचे नेते तथा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार समीर भुजबळ यांनीदेखील उमेदवारांच्या प्रचारासाठी जोर लावला आहे. त्यामुळे मतदार आता कुणाला कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीविषयी

  • मतदान केंद्रे : 1,563

  • मतदार संख्या : 13 लाख 60 हजार 722

  • महिला मतदार : 6 लाख 56 हजार 675

  • पुरुष मतदार : 7 लाख 3 हजार 968

  • इतर मतदार : 79

  • संवेदनशील-अतिसंवेदनशील मतदान केंद्रे : 266

  • मतदानासाठी बॅलेट युनिट : 4,860

  • मतदानासाठी कंट्रोल युनिट : 1,800

  • निवडणुकीसाठी अधिकारी - कर्मचारी : 8,800

  • एकूण उमेदवार : 735

  • राजकीय पक्षांचे उमेदवार : 527

  • अपक्ष उमेदवार : 208

असे आहेत पक्षनिहाय उमेदवार

  • भाजप - 115 , 3 पुरस्कृत

  • शिवसेना शिंदे गट - 102

  • राष्ट्रवादी अजित पवार गट - 42

  • उबाठा - 79

  • मनसे - 30

  • काँग्रेस - 22

  • राशप - 29

  • वंचित - 53

  • रिपाइं आठवले गट - 3

  • रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर) - 1

  • एमआयएम - 7

  • अपक्ष - 208

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT