Nashik Municipal Corporation Election 2026 Results Live Updates
नाशिक : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. पावणेचार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिककरांनी आपला कौल दिला असून, आज (दि. १६) होणाऱ्या मतमोजणीत ७३५ उमेदवारांचे राजकीय भवितव्य स्पष्ट होणार आहे.
केंद्र आणि राज्यातील सत्तेत महायुती असली तरी महापालिकेची निवडणूक भाजपने स्वबळावर लढवत १२२ पैकी ११८ ठिकाणी उमेदवार निवडणूक रिंगणात उरवले. मात्र, एबी फॉर्मच्या गोंधळात भाजपला तीन अपक्षांना पुरस्कृत करण्याची वेळ आली. महायुतीत भाजपने रस न दाखवल्याने शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) एकत्र येत युती केली. दुसरीकडे शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षानेही महाविकास आघाडी करत भाजपसमोर आव्हान उभे केल होते. या निवडणुकीतील ७३५ उमेदवारांपैकी ५२७ उमेदवार राजकीय पक्षांचे तर उर्वरित २०८ उमेदवार अपक्ष निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत. त्यामुळे मतदारांनी आता कुणाला कौल दिला आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप - ११५, ३ पुरस्कृत
शिवसेना शिंदे गट - १०२
राष्ट्रवादी अजित पवार गट - ४२
उबाठा - ७९
मनसे - ३०
काँग्रेस - २२
राशप - २९
वंचित - ५३
रिपाइं आठवले गट - ३
रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर) - १
एमआयएम - ७
अपक्ष - २०८
प्रभाग क्रमांक ७ - भाजपचे माजी नगरसेवक योगेश हिरे विरुद्ध शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते ही लढत अत्यंत चुरशीची ठरेल.
प्रभाग क्रमांक १३- भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले शाहू खैरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे गणेश मोरे यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे.
प्रभाग 9 ड- भाजपचे अमोल पाटील विरुद्ध शिंदे गटाचे प्रेम पाटील (माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र) यांच्यात कौटुंबिक वादातून निर्माण झालेली थेट लढत रंगणार आहे.
प्रभाग क्रमांक ५- माजी महापौर अशोक मुर्तडक आणि मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे गुरुमित बग्गा यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक २५- भाजपचे सुधाकर बडगुजर विरुद्ध शिंदे गटाचे ॲड. अतुल सानप आणि उबाठाचे अतुल लांडगे या तिरंगी लढतीचा निकाल काय लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
या निवडणुकीत राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. त्यामुळे हा निकाल केवळ उमेदवारांसाठीच नाही, तर नेत्यांसाठीही प्रतिष्ठेचा मानला जात आहे. उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आमदार चित्रा वाघ, शिवसेना शिंदे गटातर्फे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, दादा भुसे, हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे सुनील तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, शिवसेनेतर्फे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, मनसेतर्फे राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये सभा घेत निवडणुकीचा फड गाजवला.
विशेष म्हणजे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकून '१०० पार'चा नारा दिला आहे, तर दुसरीकडे दादा भुसे आणि समीर भुजबळ यांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.