Nashik Politics  
नाशिक

Nashik Politics | मनपा हद्दीतील खेडे विकासासाठी जादा निधी

महापौर हिमगौरी आडके यांची घोषणा : बोलू न दिल्याने महासभेत नगरसेवकांचा गोंधळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महानगरपालिकेच्या स्थापनेला तब्बल ४४ वर्षे उलटल्यानंतरही मनपा क्षेत्रात समाविष्ट २४ खेडी विकासापासून वंचित राहिल्याचा दावा करत या परिसरातील नागरिकांना न्याय कधी मिळणार, असा संतप्त प्रश्न सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत केला.

खेडे परिसरातील रस्ते, पाणी, गटारी, पथदीप या मूलभूत प्रश्नांकडे महासभेचे लक्ष वेधत खेडे विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील नगरसेवकांकडून करण्यात आली. चर्चेअंती मनपा हद्दीतील खेडे विकासासाठी अंदाजपत्रकात जादा तरतूद उपलब्ध करून देण्याची ग्वाही देताना खेडे विकास निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी जाहीर केले. दरम्यान, सभांमधून बोलू न दिल्याने विरोधकांसह सत्तारूढ गटातील काही नगरसेवकांनी महापौरांच्या पिठासनासमोर धावून जात ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केला. परंतु, महापौरांनी खरे बोलू सुनावत महासभा गुंडाळली. सभा संपल्यानंतरही उशिरापर्यंत सत्तारूढ गटातील शिवसेना नगरसेवकांनी पीठासनासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

महापौर आडके यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत महापालिकेची महासभा बुधवारी (दि. १८) पार पडली. महापालिका हद्दीतील खेड्यांच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत उपमहापौर विलास शिंदे, प्रमोद पालवे, संगीता घोटकर, दिनकर पाटील, भारती धिवरे यांनी महासभेत अशासकीय प्रस्तावाद्वारे खेडे विकासासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. खेडे विकासासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष २०१२ मध्ये अंदाजपत्रकात दाखवण्यात आले नसते तर खेडे परिसर विकासापासून वंचित राहिला नसता, असा आरोप करत खेड्यांचा गेल्या २४ वर्षांचा वनवास कधी संपणार, असा सवाल उपमहापौर शिंदे यांनी केला. भगवान दोंदे, केशव पोरजे यांनी दाढेगाव, वडनेर दुमाला, पाथर्डी खेडे परिसरातील प्रश्नांकडे लक्ष वेधले. रुचिका साळवे यांनी पेठरोडी, वाडेगाव, देवळाली, प्रमोद पालवे यांनी मखमलाबाद, रिद्धेश निमसे यांनी नांदूर-मानूर, आश्विन हर दीपाली गिते यांनी म्हसरूळ भागातील मूलभूत सुविधांविषयक प्रश्न सभागृहात मांडले. किरण राजवाडे यांनी अंबड, मोरवाडी गाव, इंदुबाई नागरे यांनी पिंपळगाव खांब, प्रियंका दोंदे यांनी अंबडगाव, सुप्रिया खोडे यांनी वडाळागाव, वैशाली दाणी यांनी विहितगाव, सविता काळे, नयना जाधव यांनी सातपूर, उषा बेदकुळे यांनी गंगापूर गाव, आनंदवली तर प्रशांत दिवे यांनी दतक गावातील प्रश्न मांडत खेडे विकास निधीच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याची आग्रही मागणी केली. यावेळी महापौर हिमगौरी आडके यांनी खेड्यांचा परिसर समाविष्ट असलेल्या प्रभागांसाठी अंदाजपत्रकात जादा तरतूद करण्याची घोषणा केली. खेडे विकास निधीसाठी लवकरच मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे, पवार यांची भेट घेतली जाणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले.

विरोधकांसह सत्तारूढ शिवसेना नगरसेवकांचा ठिय्या

खेडे विकास निधीच्या अशासकीय प्रस्तावावर बोलण्यास सभागृहात अनेक नगरसेवक इच्छुक होते. महापौरांनी प्रभागातील एका नगरसेवकाला बोलण्याची संधी दिल्यानंतर त्याच प्रभागातील दुसऱ्या नगरसेवकाला बोलण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. योगेश भोर, भारती ताजनपुरे यांनी महापौरांच्या पीठासनासमोर ठिय्या आंदोलन केले. परंतु, महापौरांनी आपले म्हणणे लेखी मांडा, असे सांगितल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले. मात्र, यानंतर महापौरांनी आपला निर्णय जाहीर करत सभासदांचे प्रस्ताव तसेच जादा विषयातील प्रस्तावही मंजूर करत महासभा संपल्याचे जाहीर केल्याने विरोधक उडाला. काँग्रेससोबत सत्तारूढ शिवसेनेतील नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला. भागवत आरोटे, किरण गामणे, योगेश भोर, भारती ताजनपुरे यांनी पीठासनासमोर ठिय्या आंदोलन केले. महापौर सभागृहात बोलू देत नाहीत, त्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, महापौर शहराच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत, असा आरोप भागवत आरोटे, भारती ताजनपुरे यांनी केला. यानंतर सभागृहालगतच्या महापौरांच्या दालनातही या नगरसेवकांनी धाव घेत महापौरांकडे नाराजी व्यक्त केली. उशिरा घटनेचे केशव पोरजे, प्रथमेश गिते यांनी महापौरांकडे संतप्त भावना मांडल्या. मात्र, आधी आपल्या नगरसेवकांना शिस्त लावा, असे महापौरांनी सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT