नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका आरोग्य विभागाकडून शहरभर डेंग्यू आणि मलेरिया प्रतिबंधासाठी सघन आणि व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू संवेदनशील भाग, पूर्वी रुग्ण आढळलेले क्लस्टर्स तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या परिसरांमध्ये विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
यासाठी आरोग्य विभागाकडून ६२ विशेष डेंग्यू प्रतिबंध पथके कार्यरत करण्यात आली आहेत. ही पथके घराघरांत तपासणी, अळी शोध मोहीम, पाण्याचे स्रोत पडताळणी, फॉगिंग, औषधफवारणी तसेच जनजागृती उपक्रम राबवत आहेत. मागील वर्षी ज्या विभागांमध्ये अतिरिक्त प्रादुर्भाव आढळला अशा भागांमध्ये विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
रिकामे प्लॉट, बांधकामस्थळे, बेसमेंट, स्क्रॅप डेपो, टायर दुकाने, छतावरील पाण्याच्या टाक्या आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची विशेष तपासणी करण्यात येत असून, अळी आढळणाऱ्या ठिकाणी तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचाही इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाकडून शहरभर धूर फवारणी, फॉगिंग, अळीनाशक फवारणी तसेच पाण्याचे स्रोत रिकामे करण्याची मोहीम अधिक वेगाने सुरू असून, नागरिकांच्या सहभागातून डेंग्यूमुक्त नाशिकसाठी व्यापक जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि प्रशासनाच्या नियोजनबद्ध मोहिमेमुळे प्रतिबंधात्मक उपाय अधिक प्रभावीपणे राबविले जात आहेत.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूमुक्त नाशिकसाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहते. नागरिकांनी घराभोवती पाणी साचू देऊ नये. पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात. आठवड्यातून एकदा ड्राय डे अर्थात कोरडा दिवस पाळावा.- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका