Garbage Depot Pudhari
नाशिक

Nashik Cidco Garbage Fine 202 | सिडको विभागात 20 दिवसांत एक लाख रुपयांहून अधिक दंड वसूल

Nashik Cidco Garbage Fine 202 | विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या अधिपत्त्याखाली विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे, प्रतिबंधित प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर करणारे, ओला व सुका कचरा वर्गीकरण न करणारे, बांधकाम व पाडकामातील ढिगारा रस्ते, मोकळे प्लॉट, सार्वजनिक ठिकाणे तसेच नदी नाल्यांमध्ये टाकणारे, कचरा जाळून पर्यावरण प्रदूषण करणारे तसेच शहरात ब्लॅक स्पॉट निर्माण करणाऱ्या नागरिक व व्यावसायिकांविरुद्ध महापालिका, सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विशेष धडक मोहीम राबवून २० दिवसांत एक लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केल्याची माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी दिली.

विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या अधिपत्त्याखाली विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये स्वच्छता निरीक्षक विशाल आवारे, विजय थोरात, जयंत राबडिया, स्वच्छता मुकादम बिरजू गोगलिया आदींचा समावेश आहे.

या पथकाने सिडको विभागातील विविध भागांमध्ये नियमित गस्त, पाहणी व दंडात्मक कारवाई सुरू केली. एक जून ते २० जून या कालावधीत विविध नियमभंग करणाऱ्या नागरिक, व्यावसायिकांविरुद्ध एक लाख रुपयांपेक्षा अधिक दंडात्मक कारवाई करण्यात आली. काही नागरिक कामावर जाताना अथवा रात्री फिरण्यासाठी बाहेर पडताना घरगुती कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच काही व्यावसायिकांकडून बाजारपेठेत निर्माण होणारा केरकचरा रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेला व मोकळ्या जागांमध्ये टाकण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या दोन दिवसांत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या नागरिकांवर प्रत्येकी रुपये दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम, घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम तसेच लागू असलेल्या इतर कायद्यांनुसार दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

नागरिक, व्यावसायिकांना आवाहन

नवीन नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सर्व नागरिक, व्यावसायिक, व्यापारी व आस्थापनांना आवाहन करण्यात येते की, घरगुती व व्यावसायिक कचरा केवळ महापालिकेच्या घंटागाडीतच द्यावा. ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा. बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्याची विल्हेवाट नियमांनुसार लावावी. निर्माण झालेला घनकचरा निर्धारित शुल्क भरून अधिकृत पावतीद्वारे महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या मक्तेदारामार्फत उचलण्यात येईल, असा इशारा दिला आहे

सिडको व परिसर अस्वच्छ करणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध रुपये दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील.
- संजय गांगुर्डे, विभागीय स्वच्छता निरीक्षक, सिडको

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT