नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बालविवाहाची हानिकारक प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'बालविवाह मुक्त भारत' अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्याचे निर्देश नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.
बालविवाह रोखणे आणि बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने २७ नोव्हेंबर २०२४ रोजी 'संपूर्ण शासन आणि संपूर्ण समाज' या दृष्टिकोनातून हे अभियान सुरू केले. या मोहिमेला सातत्यपूर्ण गती देण्यासाठी २१ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर २०२६ या कालावधीत १०० दिवसांचे विशेष जनजागृती अभियान पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत २७ नोव्हेंबरच्या सुमारास राज्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वयोगटाला अनुरूप जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यापर्यंत शासनाच्या सूचना पोहोचविणे अपेक्षित आहे.
विद्यार्थ्यांमध्ये बालविवाहाचे दुष्परिणाम, बालकांचे हक्क आणि बालविवाह रोखण्यातील सामाजिक जबाबदारी याविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
तसेच क्षेत्रीय अधिकारी आणि नागरिकांनी 'बालविवाह मुक्त भारत' पोर्टलच्या माध्यमातून बालविवाहविरोधी प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही शासनाने सूचित केले आहे. अभियानाचा व्यापक प्रसार होण्यासाठी संबंधित जनजागृती साहित्य, चित्रफिती, प्रतिज्ञा साहित्य आणि अन्य माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.