blood component bank Pudhari
नाशिक

Nashik blood component bank| महापालिकेच्या रक्तघटक रक्तपेढीला केंद्राची मान्यता

पुढील महिन्यात नाशिककरांच्या रुग्णसेवेत दाखल होणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : चलार्थपत्र मुद्रणालय अर्थात करन्सी नोटप्रेसच्या सीएसआर निधीतून नाशिकरोड येथील महापालिकेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उभारण्यात आलेल्या रक्तघटक रक्तपेढीला केंद्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची मान्यता मिळाली आहे. पुढील महिन्यात ही रक्तपेढी रुग्णसेवेत दाखल होणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य-वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी दिली.

नाशिकरोड येथील महापालिकेच्या जे.डी.सी. बिटको (जुने) रुग्णालयात डिसेंबर 1991 पासून रक्तपेढी कार्यरत आहे. या रक्तपेढीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्तपुरवठा केला जातो. मात्र, या रुग्णालयात रक्तविघटन युनिटची सुविधा नसल्यामुळे आंतररुग्ण व बाह्यरुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत. नाशिकरोड विभागात महापालिकेच्या माध्यमातून नूतन बिटको रुग्णालय अर्थात

स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या नूतन रुग्णालयाच्या इमारतीत 3 हजार चौरस फूट जागा रक्तविघटन रक्तपेढीसाठी आरक्षित करण्यात आली आहे. महापालिकेने चलार्थपत्र मुद्रणालयाला पत्र पाठवत या रक्तविघटन रक्तपेढीसाठी सीएसआर निधीतून 3.66 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. चलार्थपत्र मुद्रणालयाने सीएसआरअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला. यातून रक्तघटक रक्तपेढीकरिता उपकरणांसह आवश्यक सामग्री खरेदीसाठी 3.17 कोटी रुपये तर स्थापत्यविषयक कामे, फर्निचर, एसी, विद्युत कामांसाठी सुमारे 45 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. रक्तघटक रक्तपेढीसाठी केंद्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची मान्यता बंधनकारक असल्याने या विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास केंद्राची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ही रक्तपेढी पुढील महिन्यात सुरू केली जाणार आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी यासाठी विशेष लक्ष पुरविले होते, असे डॉ. देवकर यांनी सांगितले.

खासगीकरणाचा प्रस्ताव रद्द

सदर रक्तपेढीचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यास विरोध झाल्याने महापालिकेने स्वत: ही रक्तपेढी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रक्तपेढीसाठी मानधनावर 8 रक्तपेढी तंत्रज्ञ, 6 परिचर प्रयोगशाळा आदी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

झाकिर हुसेन रुग्णालयातील नवजात शिशु कक्षही सुरू होणार

महापालिकेच्या माध्यमातून जुने नाशिक परिसरातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात नवजात शिशु कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांअभावी हा कक्ष बंद होता. आता मात्र या कक्षासाठी दोन बालरोगतज्ज्ञ,2 हेड नर्स, 10 नर्स, 7 वॉर्डबॉयची नियुक्ती करण्यात आली असून, पुढील महिन्यात हा कक्षही सुरू केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT