Nashik Municipal Corporation 
नाशिक

Nashik Municipal Corporation | मनपा कर्मचाऱ्यांसाठी महापौरांची महासभेत घोषणा

Nashik Municipal Corporation | 31 हजार 500 सानुग्रह अनुदान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अपुरे मनुष्यबळ असूनही चांगली कामगिरी बजावणाऱ्या महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त ३१,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी मंगळवारी (दि. ६) महासभेत केली. महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस, रोजंदारी व मानधनावरील कर्मचारी, सफाई कर्मचारी, बूस्टर पंपिंग कर्मचारी व शिक्षण विभागातील शिक्षक-शिक्षकेतर अशा साडेचार हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

गतवर्षी २३ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा सानुग्रह अनुदानात आठ हजार रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. महापालिकेतील शासन अनुदानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियमित कर्मचाऱ्यांच्या ७० टक्के म्हणजेच २२ हजार ५० रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
दिवाळीनिमित्त दरवर्षी पालिका प्रशासनाच्या वतीने सानुग्रह अनुदान जाहीर केले जाते. सन २०२६ मध्ये नाशिक महापालिका म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. तर भाजपप्रणीत कर्मचारी संघटनेने ३१ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती.

राष्ट्रवादी गटनेत्या सीमा ठाकरे, भाजप गटनेते ॲड. श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, सुधारक बडगुजर यांनीदेखील ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव महासभेवर सादर केला होता. त्यानुसार महापौर आहेर-आडके यांनी महापालिका आस्थापनेवरील कायमस्वरूपी कर्मचारी, प्राथमिक शिक्षक व रोजंदारीवरील कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, मानद वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी मुख्यसेविका, सेविका, मदतनीस यांना ३१ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महासभेत केली.

साडेचार हजार कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. शासनाच्या अनुदानातून मानधन घेणाऱ्या क्षयरोग नियंत्रण, हिवताप व एड्स नियंत्रण सोसायटी, बूस्टर पंपिंग स्टेशन, समग्र शिक्षा अभियान, एन.यू.एच.एम., एन.यू.एल.एम., आशा कर्मचारी, 'युनिसेफ' व सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत कर्मचाऱ्यांना तसेच शासन अनुदानातून नियमित वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनपा कायम कर्मचाऱ्यांच्या ७० टक्के अर्थात २२ हजार ५० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

मनपा तिजोरीवर २२ कोटींचा बोजा:

दिवाळी सानुग्रह अनुदानासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात १६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. गेल्या वेळेस २३ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात आले होते. त्यात यंदा आठ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सानुग्रह अनुदानामुळे यावर्षी महापालिकेच्या तिजोरीवर २२ कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या लेव्हल एस-१७ व त्यापेक्षा कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याने आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अधीक्षक अभियंता, शहर अभियंता, आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहायक आयुक्तांना सानुग्रह अनुदान मिळणार नाही.

"सद्यस्थितीत कमी मनुष्यबळात मनपा कर्मचारी काम करत आहेत. त्यातच सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांवर आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून यंदाच्या दिवाळीनिमित्त ३१ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे."
— हिमगौरी आहेर-आडके, महापौर, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT