Nashik Municipal Corporation : महापालिका निवडणुकीसाठी 1568 मतदान केंद्रे File Photo
नाशिक

Nashik Municipal Corporation : महापालिका निवडणुकीसाठी 1568 मतदान केंद्रे

मतदान केंद्रांची यादी निवडणूक शाखेकडून जाहीर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार नाशिक मनपा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार मनपासाठी १५६८ मतदान केंद्रे असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर ७०० ते ८०० मतदार हक्क बजावणार आहेत.

नाशिक मनपा निवडणुकीसाठी १५ जानेवारीस मतदान होत आहे. दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीस मतमोजणीद्वारे निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार शनिवारी (दि.२०) मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. मनपा निवडणुकीसाठी १५६८ मतदान केंद्रे तयार केली जाणार आहेत. त्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या प्रभाग २५ मध्ये ६६ मतदान केंद्रे आहेत. प्रभाग १९ मध्ये सर्वात कमी ३८ मतदान केंद्रे आहेत. २७ डिसेंबरला केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रभागनिहाय मतदान केंद्रे

प्रभाग क्र. १-५२, २-५१, ३-५८, ४-४९, ५-४९, ६-६०, ७-५०, ८-४३, ९-४३, १०-४७, ११-५०, १२-४८, १३-६०, १४-६५, १५-४७, १६-४५, १७-५१, १८-४३, १९-३८, २०-४३, २१-२५, २२-४१, २३-५९, २४-४९, २५-६६, २६-४९, २७-४३, २८-५२, २९-४८, ३०-६२, ३१-५५. एकूण- १५६८.

मतदान केंद्रांवर या सुविधा

मतदान केंद्र स्थित असलेल्या इमारतीत वीज पुरवठा, पुरेसा उजेड व खेळती हवा, पंखे, पिण्याचे पाणी, स्त्री-पुरुषांसाठी शौचालय, मतदान केंद्रावर टेबल, खुर्ची, पंखे, बेंच, मतदारांना रांगेत उभे राहण्याच्या जागेवर सावलीसाठी शेडस‌् सोयी सुविधा पुरवल्या जातील. वृद्ध, दिव्यांगांना मतदान केंद्रावर जाणे सुकर व्हावे यासाठी रॅम्पची सोय केली जाणार आहे. अपंग मतदारांसाठी तळ मजल्यावर केंद्र ठेवले जाणार आहे.

आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती

मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. स्थानिक संस्कृती आणि गरजेनुसार मतदान केंद्रांत अतिरिक्त आकर्षण, वैशिष्ठ्ये जोडली जाऊ शकतात. पर्यावरणपूरक, पुनर्वापर योग्य व जीवाणूच्या सहाय्याने कुजवता येण्यासारख्या बायोडिग्रेडेबल साहित्याचा वापर करत मतदान केंद्रे उभारण्याच्या व ती प्लास्टिकमुक्त ठेवण्याच्या सूचना आहेत. जास्तीत जास्त मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्रे ठेवण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत.

महिला मतदान केंद्र

ज्यावर केंद्रावर महिला मतदारांची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी नियुक्त पोलिस सर्व अधिकारी, कर्मचारी म्हणून महिलांची नियुक्ती केली जाईल. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात कोणत्याही पक्षाचे, प्रतिनिधींचे कार्यालय राहणार नाही. १०० मीटर त्रिज्येच्या परिघाबाहेर प्रत्येक उमेदवारास केवळ एक मतदान सहाय्य केंद्र उभारता येईल. केंद्रावर केवळ १ टेबल, २ खुर्ची, सावलीसाठी छत्री, ताडपत्री, कापड टाकण्याची परवानगी असेल.

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल फोन नेण्यास बंदी असेल. मतदान केंद्र १०० मीटर परिघात व मतदान केंद्रावर कर्मचारी वृंद, पोलिसांव्यतिरीक्त कोणीही मोबाईल, कॉर्डलेस फोन, वायरलेस फोन वापरणार नाही. वृद्ध, अपंग, दिव्यांगांना केंद्राच्या १०० मीटर परिघात मोबाईल फोन आणल्यास त्यांना असे मोबाईल फोन बंद ठेवावे लागतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT