नाशिक

नाशिक : मनपाचे अंदाजपत्रक अडीच हजार कोटींवर ?

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेत महापालिकेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजूर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यंदाचे अंदाजपत्रक सुमारे २५५० कोटींवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रस्ते, उद्याने, पथदीप, वैद्यकीय व आरोग्य या मुलभूत सुविधांसह आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी या अंदाजपत्रकात विशेष तरतूद केली जाणार असल्याचे समजते.

गेल्या पावणेदोन वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू असल्याने प्रशासकांच्या माध्यमातून मंजूर केले जाणारे अंदाजपत्रकाचे यंदाचे सलग दुसरे वर्ष आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १.२१ कोटी या आरंभीच्या शिलकेसह २४७७ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. मात्र अंदाजपत्रकात तत्कालिन आयुक्तांनी केलेल्या टोकन तरतुदींमुळे अंदाजपत्रकात समाविष्ट केलेली बरीचशी कामे प्रत्यक्षात येऊ शकली नाहीत. बांधकाम आणि उद्यान विभागांच्या आपत्कालिन कामांवरच खर्च वाढत राहिला. त्यातच या अंदाजपत्रकात ३३३ कोटींच्या दायित्वाची रक्कम वगळण्यात आल्याने हा वाद न्यायालयाच्या दारी पाहोचला आहे. नमामि गोदा, अमृत २ यासारख्या महत्वाकांक्षी योजनेतील कामांना देखील मुहूर्त लाभू शकलेला नाही. त्यामुळे आगामी २०२४-२५या अंदाजपत्रकाकडे सर्वच माजी नगरसेवकांचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेला अंदाजपत्रक मंजूर करून घ्यावे लागणार आहे. फेब्रुवारी अखेर अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या आचारसंहितेच्या कात्रीत अंदाजपत्रक अडकू नये यासाठी २० फेब्रुवारीच्या आतच अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. आगामी अंदाजपत्रक २५५० कोटींवर जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

गत अंदाजपत्रकातील न झालेली कामे
– महापालिकेच्या जागेवर मोबाईल टावर उभारण्यास परवानगी.
– पेठ रोडचे तीस मीटर रुंदीकरण.
– पारंपारिक उत्पन्न श्रद्धांजली उत्पन्नाचे शोध.
– नवीन संगणकीय प्रणाली द्वारे बांधकाम परवानगी.
– थकबाकीदारांचे गाळे जप्ती मोहीम.
– रिंग रोड व मिसिंग लिंक रोड विकसित करण्यासाठी भूसंपादन.
– निओ मेट्रो प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा.
– सायन्स सेंटर मध्ये विद्यार्थ्यांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT