तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असताना, शहरवासीयांनी चामरलेणीच्या पायथ्याशी संगीताच्या तालावर ठेका धरला Pudhari News Network
नाशिक

Nashik Mud bath | चामरलेणीच्या पायथ्याशी 'मडबाथ'चा उत्साह

उष्णतेवर मात करण्यासाठी नाशिककरांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असताना, शहरवासीयांनी चामरलेणीच्या पायथ्याशी संगीताच्या तालावर ठेका धरत चिखल स्नानाचा (मडबाथ) मनमुराद आनंद घेतला.

पंचमहाभूतांपैकी एक असलेली माती आणि मानवी शरीर यांचे नाते अनादी काळापासूनचे आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे मातीचा स्पर्शही आज दुर्मीळ झाला आहे. निसर्गोपचारासह विविध शास्त्रांमध्ये मातीचिकित्सेला विशेष महत्त्व आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मडबाथ हे एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर, गेली २८ वर्षांपासून बोरगड येथील चामरलेणीच्या पायथ्याशी असलेल्या गोशाळेत मडबाथचे आयोजन केले जात आहे. यंदाही उन्हाची तीव्रता वाढताच नागरिकांनी या नैसर्गिक उपचार पद्धतीचा मनसोक्त अनुभव घेतला. भाजपचे ज्येष्ठ नेते नंदू देसाई, महेश शहा, चिराग शाह आदींच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानंतर दरवर्षी चिखल स्नानाचे आयोजन केले जाते. यंदाही रविवारी (दि. १२) हा उप्रकम नाशिककरांच्या प्रतिसादात पार पडला.

गुजरातमधून आणलेली माती चाळून स्वच्छ केली गेली आणि ती भिजवून तिचा लेप सर्वांगाला लावत नाशिककरांनी संगीताच्या तालावर थिरकत मडबाथचा आनंद घेतला. अबालवृद्धांनी मातीलेपन करून 'ठंडा, ठंडा कूल कूल' अशी अनुभूती घेतली.

याप्रसंगी प्रशांत जैन, किशोर माने, मोहन देसाई, भगवान काळे, अमित घुगे, नितीन जैस्वाल, प्रदीप पाटील वसंत धुमाळ, सचिन कापसे यांच्यासह ६०० हून अधिक नाशिककर उपस्थित होते.

उपचारांमध्ये मातीचिकित्सा, जलचिकित्सेचा समावेश असतो. मातीचिकित्सेमुळे शरीरातील उष्णता निघून जाते. त्वचा चकचकीत होण्यासह शरीराला थंडावा मिळाल्याने नवचैतन्य प्राप्त होते.
नंदू देसाई, आयोजन, माती स्नान उपक्रम, नाशिक
अशा उपक्रमांनी नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे. चिखल स्नान घेतल्यानंतर आलेल्या सर्व नागरिकांना फलाहार देऊन निरायमतेचा संदेश दिला गेला. चिखल स्नान ही चळवळ झाली आहे.
प्रशांत गुंजाळ, व्यावसायिक, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT