नाशिक : पोलिसांकडून सावकारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू असतानाही, काही व्हाइट कॉलर सावकार राजरोस लोकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. अशाच एका व्हाइट कॉलर सावकाराने पाच लाखांच्या खंडणीकरिता आई- वडिलांसह मुलाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित तुषार कैलास सानप (रा. ऋषिराज बिल्डिंग, जेहान सर्कल) या व्हाइट काॅलर सावकाराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
शुभम घुगे (रा. कमलनगर, सिन्नर) यांच्या फिर्यादीनुसार, २०२३ मध्ये त्यांची तुषार सानपशी ओळख झाली होती. त्यातून सानपने गंगापूर रोड येथे फ्लॅट बुक केल्यावर बिल्डरला देण्याकरिता पाच लाख रुपये उसनवार मागितले होते. फिर्यादीने सानपला नेट बँकिंगद्वारे पैसे दिले. मात्र, संशयिताने नऊ महिने होऊनही पैसे परत न केल्याने, तगादा लावल्यावर दोन टप्प्यांत चार लाख परत दिले, तर एक लाखाची मागणी करूनही तो देत नव्हता. उलट संशयिताने तक्रारदाराच्या आई- वडिलांकडेच पैशांची मागणी करीत, ‘तुम्ही जर पैसे मागितले, तर तुमच्या मुलालाच संपवून टाकू’ अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी शुभमला दोघांच्या मदतीने मारहाणही केली. तुमच्यामुळे माझे लग्न मोडले. आता तू मला भरपाई म्हणून पाच लाख रुपये दे नाही तर तुमचा गेम करतो, अशी धमकी दिल्याने घुगे यांनी भीतीपोटी ५० हजार रुपये दिले. मात्र, अशातही पाच लाखांची खंडणी मागत जिवे मारण्याची धमकी दिली
संशयित तुषार सानप हा एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा निकटवर्तीय असल्याचे सांगत असून, तो नेहमीच या आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत वावरत असतो. तसेच तो पोलिस अधिकाऱ्यांसमवेतचे फोटो व्हायरल करीत, त्यांचे व आपले थेट संबंध असल्याचे भासवत होता. त्यामुळे त्याच्याविरोधात तक्रार करण्यास कोणी पुढे येत नसल्याने, सानप याचा अतिरेक वाढतच होता. दरम्यान, सानपला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंंतर त्याच्या सुटकेसाठी राजकीय नेते पोलिस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.