सिडको (नाशिक) : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून, अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचारपद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटर नाशिकच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. पल्लवी धर्माधिकारी, अण्णासाहेब मोरे, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, डॉ. विश्वजित धर्माधिकारी, डॉ. ऐश्वर्या धर्माधिकारी आणि डॉ. अध्वर्यू कुथे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगीकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही. हा मंत्र विसरल्याने जीवनशैलीशी निगडित विविध आजारांचे प्रमाण समाजात वाढले आहे. गेल्या काही वर्षांत चिकित्सा पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचे जीवनमान वाढले आहे. साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचारपद्धतींमुळे रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळेल. सेवा करणे या उद्देशाने हे हॉस्पिटल सुरू करण्यात आल्याने गरिबातील गरीब माणसाची सेवा इथे होईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना वाजवी दरात उपचार उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटरचे प्रमुख संचालक डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी अत्याधुनिक सुविधांची माहिती दिली. श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटर हे गेल्या १५ वर्षांपासून आरोग्यसेवेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. नवीन हाॅस्पिटलमध्ये विविध सुविधा असून रुग्णालय महत्त्वाच्या सरकारी आरोग्य योजनांशी संलग्न असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी मनोगतात सांगितले की, नवीन हॉस्पिटल इमारत नियोजनाचे काम पत्नी डॉ. पल्लवी यांनी खास लक्ष देऊन पूर्ण केले व लग्नाच्या ३४ व्या वाढदिवसाची भेट असल्याचे त्यांनी सांगितले. हाच धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना डॉ. धर्माधिकारी हे हदयाचे डॉक्टर आहेत. नवीन इमारत नियोजनाच्या टेन्शेनचे काम त्यांनी बरोबर वहिणी डॉ. पल्लवींकडे दिल्याचे सांगताच सभेत जोरदार हास्यकल्लोळ झाला.