नाशिक

नाशिक : गोदावरीसाठी मनसेचं 'मारलो डुबकी... मारलो डुबकी..' आंदोलन

मनपा प्रशासनाला दूषित पाणी पाजण्याचा मनसेचा इशारा

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नदी प्रदूषणाच्या विषयावर भाष्य केले. त्यानंतर नाशिक येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.9) रोजी गोदावरी नदीवरील रामकुंडात डुबकी मारत आंदोलन केले.

गोदावरी नदीचे पावित्र्य राखत गोदा प्रदूषणमुक्त न झाल्यास मनपा प्रशासनाला शहरातील प्रत्येक नदीतील पाणी प्राशनासाठी दिले जाईल. तसेच याच नदीतील दूषित पाण्याने अंघोळ घातली जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे.

गोदावरीसाठी प्रचंड खर्च करुनही नदी स्वच्छ नाही

गोदावरी नदीसाठी मनपा प्रशासनाकडून स्वच्छतादूत नेमून आदी उपक्रम राबवूनही स्वच्छता मोहिमेवर प्रचंड खर्च करण्यात आला होता. तरीही गोदावरी नदी स्वच्छ झाली नाही. प्रशासनाने या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. 2027 मध्ये आगामी कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीसह तिच्या उपनद्या प्रदूषणमुक्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रशासनाने कायमस्वरुपी नद्या स्वच्छ कशा राहतील याकडे लक्ष देण्याची गरज सरचिटणीस पाटील यांनी यावेळी मांडली.

अन्यथा दुषित पाणी प्रशासनाला पिण्यास देवू

गोदावरीचे पाणी पिण्यायोग्य होत नाही, तोपर्यंत हे अशाप्रकारे आंदोलन केले जाईल. शहरातील प्रत्येक नदीतील पाणी प्रशासनाला पिण्यासाठी दिले जाईल. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, संदीप किरवे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, विभाग अध्यक्ष योगेश दाभाडे, सचिन सिन्हा, साधू-महंत आदी उपस्थित होते.

मनसेच्या आयोजित एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी देशातील एकही नदी स्वच्छ नसल्याचा उल्लेख करुन कुंभमेळ्यात भाविकांनी स्नान केलेल्या नदीचे पाणी कोण प्राशन करेल, श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही, असे प्रश्न उपस्थित केले होते. या घटनाक्रमानंतर मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदींच्या नेतृत्वाखाली रामकुंड परिसरात गोदावरी नदीच्या पाण्यात डुबकी मारत आंदोलन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT