नाशिक

Nashik | मनसेत राजीनामास्त्र; अंतर्गत बेबनाव चव्हाट्यावर

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकमध्ये होऊ घातलेला राज्यस्तरीय वर्धापन दिन तोंडावर असताना सोमवारी (दि. २६) सकाळी अचानक 10 ते 15 पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारल्याने त्यांच्या मनधरणीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. मनधरणीला यश आल्याने संबंधित पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घेतले. मात्र यानिमित्ताने मनसेतील अंतर्गत बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

कधीकाळी नाशिक हा मनसेचा गड मानला जात होता. ४० नगरसेवकांच्या जोरावर महापालिकेत सत्ता याचबरोबर शहरातही तीन आमदार असल्याने मनसेचा बोलबाला होता. गटबाजीचे ग्रहण लागल्यानंतर मनसेची उतरती कळा सुरू झाली. २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर 10 वर्षे उलटूनही मनसेला सूर गवसलेला नाही. पक्षाने पुन्हा उभारी घ्यावी यासाठी खुद्द राज ठाकरे तसेच त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीदेखील संपूर्ण ताकद पणाला लावली मात्र मनसेची विस्कटलेली घड अद्यापही बसलेली नाही. स्थानिक नेतृत्वाचा अभाव आणि काही जुन्या नेत्यांचा अवाजवी हस्तक्षेप यामुळे गटबाजी वाढत गेली. त्यामुळे गेल्या महिन्यात नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत नाशिकला ऑप्शनला टाकण्याबाबत इशारा दिला होता. तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही आपली कामगिरी सुधारा, मला बदल करण्यास भाग पाडू नका अशी तंबी दिली होती. पक्षातील गटबाजीवर नियंत्रण मिळाले नसताना, पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी जोरदार तयारी सुरू असताना सोमवारी सकाळी शहर कार्यकारिणीमधील विभागाध्यक्ष तसेच अन्य महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या किंबहुना पक्षाच्या अंगीकृत असलेल्या अन्य संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांचे राजीनामे सुरू झाल्यामुळे अचानक खळबळ उडाली. पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पक्षाची नाचक्की झाली. ही बाब पक्षनेतृत्वाच्या कानी गेल्यानंतर सूत्रे हलली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वांची मनधरणी केल्यानंतर राजीनामे मागे घेण्यात आले.

काही पदाधिकारी तर थेट विधानसभेचे दावेदार
मनसेत नव्याने दाखल झालेल्या काही पदाधिकाऱ्यांनी तर थेट विधानसभेसाठी दावेदारी केली आहे. यापूर्वी नगरसेवक तसेच अन्य कोणत्याही निवडणुकीचा पार्श्वभूमी नसताना थेट मोठ्या निवडणुकीसाठी थोपटलेले दंड आणि त्यांची कोणतीही कामगिरी नसताना त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिल्यामुळे जुने जाणते अस्वस्थ आहेत.

लोकसभा संघटकांविषयी नाराजी
या राजीनामा नाट्यामागे मनसेचे लोकसभा संघटक किशोर शिंदे यांच्याविषयी नाराजी असल्याचे बोलले जाते. ते विशिष्ट पदाधिकाऱ्यांचे ऐकतात. कार्यक्षमता नसलेल्या नव्यांना पक्षात मोठी पदे दिली जातात, अशी नाराजी मनसे कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत.

पक्षात सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातात अर्थात काही निर्णय थेट पक्षश्रेष्ठींकडून घेतले जातात. त्यामुळे त्याविषयी कुणाची नाराजी असण्याचे कारण नाही. कोणाची नाराजी असेल, तर ती चर्चेतून दूर केली जाईल. – किशोर शिंदे, लोकसभा संघटक

शहर कार्यकारिणीतील तसेच अन्य अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काही गैरसमजांमधून राजीनामे दिले होते. मात्र त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा मनसेसमवेत एकदिलाने काम करण्याची ग्वाही दिली आहे. – पराग शिंत्रे, प्रदेश उपाध्यक्ष.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT