Nashik MNS
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या मुख्य अधिकाऱ्यास गोधडी भेट देताना मनसैनिक. pudhari photo
नाशिक

Nashik MNS | मनसेकडून महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यास गोधडी भेट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महामार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली असताना सर्रास टोल वसुली केली जात असल्याने संतप्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या मुख्य अधिकाऱ्यास गोधडी भेट दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी महामार्गाच्या दुरावस्थेबाबतही अधिकाऱ्यास जाब विचारला.

नाशिकहून मुंबई गाठण्यासाठी पूर्वी अडीच ते तीन तासांचा अवधी लागायचा. मात्र, महामार्गाच्या दुरवस्थेमुळे सहा तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. या व्यतिरिक्त वाहनाचेही मोठे नुकसान होत असून, मणक्याच्या आजारांना देखील अनेकांना सामोरे जावे लागत आहे. महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुसरीकडे टोल वसुली जोरात सुरू असल्याने, जनतेची ही एकप्रकारे लुटच केली जात आहे. दरम्यान, मनसेने आक्रमक होत, महामार्गाला ज्या पद्धतीने थिगळं आहेत, त्या पद्धतीने थिगळं असलेली प्रतिकात्मक गोधडी मुख्य अधिकाऱ्यास भेट देत आंदोलन केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी महामार्गाच्या दुरुस्तीबाबतचे काम लवकर हाती घेतले जाणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितले. तर महामार्गाची अशीच स्थिती राहिल्यास पुन्हा-पुन्हा मनसेकडून अशाप्रकारचे आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा दिला. उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, महानगर संघटक विजय अहिरे, जिल्हा संघटक अमित गांगुर्डे, सरचिवटणीस मिलिंद कांबळे, चित्रपट सेनेचे जिल्हाध्यक्ष निखिल सरपोद्दार, नितीन धानापुणे, नितीन पंडित, साहेबराव खर्जुल, धीरज भोसले आदींच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

नाशिक-मुंबई महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असतानाही जनतेकडून हाकनाक टोलवसुल केला जात आहे. जनतेची ही आर्थिक पिळवणूक असून, मनसे याविरोधात यापुढेही आवाज उठविणार आहे. महामार्गाचे तत्काळ कामे मार्गी लावा, अन्यथा यापेक्षा अनोख्या पद्धतीने आंदोलन केले जाईल.
- मनोज घोडके, उपजिल्हाध्यक्ष, मनसे.
SCROLL FOR NEXT